ठाणे : ठाण्यातील वाहतूक मदतनिसांना (ट्रॅफिक वार्डन) भाजपचे आमदार संजय केळकर आणि समतोल सेवा फाउंडेशन यांच्यातर्फे रविवारी मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. दहा महिन्यांपासून हे कामगार वेतनापासून वंचित आहेत. टक्केवारीसाठी त्यांचे वेतन रखडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केळकर यांनी केली आहे.
आमदार केळकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत पत्राद्वारे पाठपुरावा करून त्यांच्या वेतनासाठी पाठपुरावा केला आहे. ठाणे शहर पोलिसांच्या बरोबरीने हे वॉर्डन आपले कर्तव्य चाेख बजावत आहेत. त्यांना पगार काढण्यासाठी चार टक्के कमिशनची मागणी केली जाते, ही चिंतेची बाब असल्याचे केळकर म्हणाले. टक्केवारीसंदर्भात शहरातील १८ वॉर्डननी एकत्रित स्वाक्षरींचे निवेदन पालिका आयुक्तांना दिले आहे. आ. केळकर यांच्यामुळे पगार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना दिलासा मिळावा, यासाठी सुमारे ५० वॉर्डनना मोफत धान्याचे वाटप केल्याचे केळकर यांनी सांगितले. यावेळी परिवहन सदस्य विकास पाटील उपस्थित होते.