ठाणे : महाआवास अभियान-ग्रामीणअंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे जिल्ह्यातील पांडू गणपत दरवडा आणि रसिक रवींद्र गायकवाड या आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावींचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण भागात महाआवास अभियान गतिमान पद्धतीने राबविण्यात आले. त्यामुळे अभियान काळात प्रधानमंत्री आवास योजनेची ७२८ घरकुल बांधण्यात आली तर, राज्य पुरस्कृत योजनेची ५०४ घरकुल बांधून जिल्ह्याने राज्यात दर्जेदार कामगिरी केली आहे, असे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.