ठाणे: दिवसभर भाजीपाला स्वच्छ व ताजा ठेवून त्यांची विक्री शेतकऱ्यांना करता यावी, या विक्रीतून त्यास पूर्ण मोबदला मिळावा या हेतुने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘ई कार्ट’ हे वातानुकुलित वाहन वाटप करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी कल्याण येथे या दाेन वातानुकुलित ‘ई कार्ट’ वाहनाचे वाटप शेतकरी बचत गटांना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, असे ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी लोकमतला सांगितले.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सेस फंडातून पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत शेतकरी बचतगट यांना या ई-कार्ट’ वाहनाचे वाटप करण्यात येत आहे. आता पर्यंत दाेन वाहनांचे वाटप झालेले आहे. त्यापैकी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपील पाटील व आमदार किसन कथाेरे यांच्या हस्ते प्रत्येकी एक वाहन वाटप झाले आहे. उर्वरित दाेन वाहनांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी हाेत आहे. यानंतरही उर्वरित चार ‘ई कार्ट’ वाहनांचे वाटप शेतकरी बचत गटांना करण्यात येणार, असे पाचे यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यांना या ई कार्ट’ वाहनाचा लाभ हाेत आहे. भाजीपाला विकता यावा यासाठी हे ई कार्ट वाहन १० टक्के अनुदानावर वाटप केले जात आहे. भिवंडीच्या दिवे-अंजूरा येथे पाटील यांच्या हस्ते अलिकडेच एक वाहनाचे वाटप समारंभपूर्वक करण्यात आले.
या ई कार्टव्दारे भाजीपाला ताजातवाणा ठेवण्याची खास व्यवस्था आहे. हा भाजीपाला विकल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. शेतकरी बचतगटांनी स्वत: पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची संधी या ई कार्ट’ वाहनामुळे उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषदेकडून बचतगटांना हे ‘ई कार्ट’ स्वत:चे वाहन उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होऊन स्वत:चा जास्तीत जास्त वेळ शेतीच्या व इतर कामासाठी देता येईल. ग्राहकांना माफक दरात ताजा शेतमाल उपलब्ध होऊन भाजीपाल्याची नासाडी कमी होईल. ई-कार्ट वाहनामुळे इंधन खर्चात बचत व प्रदुषणमुक्त वाहन उपलब्ध हाेईल. तापमान नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित व्यवस्था या वाहनामध्ये उपलब्ध आहे. वाहनामध्ये भाजीपाल्याच्या प्रकारानुसार पध्दतशीर मांडणीसाठी व साठवणूकीसाठी अतिरिक्त व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती पाचे यांनी दिली.