भिवंडी : भिवंडी शहरात परप्रांतातून येवून भंगार वेचण्याचे काम करणाऱ्या कुटुंबातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेने या विद्यार्थ्यांना मंगळवारी पावसाळ्यासाठी रेनकोट वितरण केले आहे.सदभावना मंच डोंबिवली व स्वयं सिद्धी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेश सोनी यांच्या सहकार्यातून श्री साई सेवा संस्थेच्या संस्थापिका डॉ स्वाती सिंह यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख प्रसाद पाटील, ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक कृष्णगोपल सिंग,आर्मी जवान फुलसिंह आदी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना रेनकोट वितरण करण्यात आले आहे.
भिवंडी रेल्वे स्टेशन परिसरात मागील कित्येक वर्षांपासून भंगार गोळा करणे व इतर मजुरीचे काम करणाऱ्या परप्रांतीय कुटुंबाची वस्ती आहे. येथील लहान मुले भीक मागणे, चोऱ्या करणे या कामा कडे वळू नयेत यासाठी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डॉ स्वाती सिंह यांनी मागील तीन वर्षां पासून या भागात कार्य सुरू केले आहे.या दरम्यान ठाणे महिला व बाल विकास विभागा कडून या भागात फिरती शैक्षणिक बस च्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लावल्या नंतर या शैक्षणिक वर्षात जवळच्या महानगरपालिका शाळेमध्ये येथील तब्बल शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे अशी माहिती श्री साई सेवा संस्थेच्या डॉ स्वाती सिंह यांनी दिली आहे.