ठाणे : झेप प्रतिष्ठानतर्फे मुलुंड पूर्व येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचरावेचक महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे रविवारी वाटप करण्यात आले. ठाणे मुलुंड शहरातील कचरा जिथे एकत्र केला जातो. त्या कचऱ्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कचरावेचक महिलांना मासिक पाळी दरम्यान घेतल्या जाणाऱ्या आरोग्याच्या काळजीविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याचे प्रतिष्ठानचे विकास धनवडे यांनी सांगितले. याचसोबत मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट कशी लावावी, यावरही मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात या महिलांना तीन महिने पुरेल इतके नॅपकिन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांना प्रत्येक तीन महिन्यांनी हे वाटप करण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा उपक्रम अत्यंत कमी वेळात आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून करण्यात आला.
----------