उल्हासनगर : शहरातील बेघर, वृध्दांसाठी सुरू केलेले रात्र निवारा केंद्र दुरवस्थेमुळे बंद पडल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून नागरिकांसाठी येथे गं्रथालय उघडण्याची मागणी समाजिक कार्यकर्ते प्रशांत चंदनशिवे व प्रवीण करीरा यांनी पालिकेकडे केली आहे.
उल्हासनगर महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार बेघर, वृध्द, भिकाऱ्यांसाठी रात्र निवारा केंद्र समाजमंदिरात सुरू केली होती. त्याठिकाणी वीज, पाणी, अंथरूण, स्वच्छतागृह, जेवणाची व्यवस्था पालिकेने केली होती. दरम्यान, राष्ट्रीय उपजिविका कार्यक्रमा अंतर्गत सामाजिक संस्थेमार्फत बेघर निवारा केंद्र राज्य सरकारने सुरू केली. त्यामुळे पालिकेने रात्र निवारा केंद्र बंद करून त्यातील नागरिकांना बेघर निवारा केंद्रात हलविण्यात आले. फॉरवर्ड लाईन व शहाड येथे बेघर निवारा केंद्र सुरू केले असून त्याठिकाणी बेघर नागरिकांची व्यवस्था केली आहे. मात्र बंद पडलेल्या रात्र निवारा केंद्राची दुरवस्था होऊन तेथे अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त होत आहे.कॅम्प नं-४ परिसरातील बंद पडलेल्या रात्र निवारा केंद्राची दुरवस्था होऊन भिंती कोसळत आहेत. त्याठिकाणी भूमाफियांकडून केव्हाही अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त होत आहे.नागरिक, कॉलेज तरूण-तरूणीसाठी गं्रथालय उघडण्याची मागणी चंदनशिवे व करीरा यांनी करून तसे निवेदन पालिकेला दिले. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी सध्याच्या परिस्थितीत महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने दुरवस्था झालेली आहे, अशी कबुली दिली.