ठाणे : विविध संस्थांच्या भाऊगर्दीत आपलं वेगळंपण सिद्ध करून, समृद्ध आणि नेटके उपक्रम राबविण्यात व्यास क्रिएशन्स् ही संस्था नेहमीच आघाडीवर राहिली आहे. नाविन्याचा ध्यास घेऊन सृजनशीलता जपणारी व्यास क्रिएशन्स् संस्था प्रकाशन आणि समारंभ या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे. ‘ज्येष्ठ एक राष्ट्रीय संपत्ती’ हा विचार रूढ करण्यासाठी ‘व्यास क्रिएशन्स्’तर्फे प्रतिवर्षी ज्येष्ठ महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही मंगळवार 6 मार्च रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे ज्येष्ठ महोत्सव साजरा होणार आहे.
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ रत्न आणि सेवा रत्न पुरस्कारांचे वितरण, नामवंत डॉक्टर्स व वैद्यांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांसाठी आरोग्य व अध्यात्म या विषयावर सुसंवाद, मान्यवरांची व्याख्याने, मनोरंजनाचा कार्यक्रम, पुस्तक भेट, अल्पोपहार, जेवण... आदींची रेलचेल असेल. ज्येष्ठांचा वाढता पाठिंबा, तज्ज्ञ व श्रेष्ठींची उपस्थिती यामुळे महोत्सवाची वाढती कमान सर्वांनाच आकर्षित करीत आहे. ज्येष्ठ रत्न (वय वर्षे 60 वरील) आणि सेवा रत्न (विशेष सेवा) पुरस्कारासाठी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदि क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींचे परिचयपत्र (1 फोटोंसह) 24 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत असे आवाहन संस्थेतर्फे केले आहे. याचेच औचित्य साधून खास जेष्ठांसाठी ‘ज्येष्ठ विश्व’ नावाचे मासिक व्यास क्रिएशन्सतर्फे प्रकाशित होत आहे. साहित्य, अध्यात्म, कायदा, आर्थिक स्वावलंबन, शासकीय योजना, मनोरंजन अशा अनैक पैलूंवर भाष्य करणारे हे मासिक असेल. सदर मासिकाची मूळ किंमत रु. 60/- आहे. वार्षिक वर्गणी रु. 600/- (टपाल खर्चासहित-संपूर्ण महाराष्ट्रभर) आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठांनी याचे सभासदत्व स्विकारावे, असे आवाहन व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी केले आहे. यंदाचा १७ वा ज्येष्ठ महोत्सव आहे. ज्येष्ठांसाठी युवांकांमार्फत होणारा राज्यातील एकमेव हा महोत्सव आहे.. आजवर मच्छिन्द्र कांबळी,शंकर अभ्यंकर, पुरुषोत्तम बेर्डे, आशा खाडिलकर, अरुण नलावडे, आनंद अभ्यंकर अशा अनेक मान्यवरांनी महोत्सवाला उपस्थिती लावली आहे. या महोत्सवानिमित्त ज्येष्ठांची आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता मोहीम हि रॅली काढली जाते. आजवर ठाणे जिल्ह्यातील ५००० हुन आरोग्य विषयक तपासण्या विनामूल्य केल्या आहे. गेली ३ वर्षे समाजात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला पुरस्कार दिला जातो. अशा दाम्पत्यांनी आपली माहिती संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन केले आहे. आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला कृतार्थ जीवन पुरस्कार दिला जातो, गेल्या ३ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. या महोत्सवाला ठाणे जिल्हा व आसपासच्या परिसरातील हजारो ज्येष्ठ गर्दी करतात, १०० हुन अधिक ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित असतात असे निलेश गायकवाड यांनी सांगितले.