- मनीष दोंदे खर्डी : उन्हाची काहिली वाढत चालली असतानाच खर्डी विभागातील दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील पळशीण, बोरीचापाडा, वझर, वडाचापाडा, बोराळा, शिशिवली आदी गावपाड्यांना सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.दहिगाव ग्रुपग्रामपंचायतीत जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या असून या ग्रामपंचायतीचा विस्तार हा पाच गावे, त्याचे पाडे, जंगलपट्टी एवढा आहे. दहिगाव आणि पळशीण या दोन गावांसाठी ग्रा.पं.ने दहिगावजवळील तलावातून नळपाणीपुरवठा योजना बांधली आहे. मात्र, तलावातील पाणीसाठा फेब्रुवारी-मार्चपर्यंत असतो. त्यानंतर, तलावातील पाणी आटत जाते. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या ग्रामपंचायतीमध्ये सात विहिरी आहेत. त्यापैकी दहिगावच्या विहिरीला पाणी आहे. तर, उर्वरित सहा विहिरींमधील पाणी मार्च महिन्यापर्यंत पुरते. नंतर, त्याही कोरड्याठाक होऊन जातात.एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठापळशीण, वझर, बोरीचापाडा, वडाचापाडा येथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. बोरीचापाडा येथील महिलांना दीड ते दोन किलोमीटरहून पाणी डोक्यावरून वाहून आणावे लागते. ग्रामपंचायतीने यंदा शासनाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली. सध्या एक दिवसाआड तीन टँकरद्वारे पाणी विहिरीमध्ये टाकले जाते, मात्र तरीही हे पाणी पुरत नसल्याने महिलावर्ग त्रस्त झाला आहे. टँकरच्या फेऱ्या वाढवून दररोज पाणीपुरवठा केला जावा, असे स्थानिक महिलांनी ‘लोकमत’ला सांगितले. जंगलातील वस्तीला गाडीरस्ता नसल्याने टँकर वस्तीपर्यंत पोहोचत नाही. ग्रामपंचायतीने छोटा टँकर नेण्याचा प्रयत्न केला होता, पण रस्ता नसल्याने पुन्हा टँकर पाठवणे शक्य नाही. पळशीण येथे एक खाजगी बोअरवेल असून येथील महिला या बोअरवेलचे पाणी विकत घेत असत. मात्र, २० दिवसांपासून त्याचेही पाणी कमी झाल्याने पाण्याची वणवण थांबता थांबत नाही. यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत.शासनाने टँकर दररोज पाठवण्याची व्यवस्था करावी. एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने ते पुरत नाही. महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.- वैशाली घरत, सदस्य, ग्रामपंचायत, दहिगावआम्ही शासनाकडे जादा टँकरची मागणी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फतही खाजगी टँकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.- दीपक सापळे, उपसरपंच, ग्रामपंचायत, दहिगावआवश्यकतेनुसार टँकरचा पाणीपुरवठा वाढवला जाईल.- एम.जी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, शहापूर पंचायत समिती
शहापूर तालुक्यात महिलांची पाण्यासाठी वणवण थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 2:26 AM