पालघर- केंद्र सरकारने एनएचएमच्या माध्यमातून गेल्या वर्षी राज्याला डिसीएच, सीसीएचसह अन्य सुविधांसाठी 70 कोटींची मदत देत व्हेंटिलेटरचा मोठा पुरवठा केला. अशावेळी पालघर शहरातील ग्रामीण रुग्णालयांत एकही व्हेटिलेटर नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करत, केंद्राच्या निधीचा योग्य विनियोग होत असल्याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार ह्यांनी संशय व्यक्त केला. (District administration ignoring to Union Minister of State for Health; Dr. Bharti Pawar lashed out the Collector)
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पालघर जिल्ह्याच्या ''जन आशीर्वाद यात्रे"च्या सुरुवातीपासूनच आपल्याला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. शासकीय विश्रामगृहापासून असुविधेचा सामना करीत असताना केंद्रातून राज्यांना देण्यात आलेल्या 23 हजार कोटींच्या पॅकेजमधून सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात आल्या? कोव्हिडं 19 च्या पार्श्वभूमीवर किती लसीकरण झाले, किती धान्य वाटप झाले? तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना आखण्यात आल्या? याची माहिती देण्यासाठी मी स्वतः जिल्हाधिकाऱ्याना मेसेज टाकूनही त्यांनी आपली भेट घेण्याचे स्वारस्य न दाखविल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
जिल्हा प्रशासनाचा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा खूप वाईट अनुभव आला असून त्यांचे हारतुरे स्वीकारायला नाही तर सर्वसामान्यांचे, आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही जन आशीर्वाद योजनेतून फिरत आहोत. राज्यशासनाच्या दबावाखाली जिल्हाप्रशासन काम करीत असल्याचे सांगून आम्हा आदिवासींना आपण कमी लेखता का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.
डॉ. पवार यांनी सोमवारी सकाळी 9 वाजता पालघर ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर हुतात्मा स्तंभाला अभिवादन, वाघोबा मंदिर, मनोर, महालक्ष्मी मंदिर दर्शन, तलासरी येथे माजी दिवंगत आमदार पास्कल धनारे ह्यांच्या कुटुंबियांची भेट, वनवासी कल्याण केंद्र, रिव्हेरा हॉस्पिटल भेट, धान्य वाटप, आवास योजना लाभार्थी भेट, जव्हार, मोखाडामधील लाभार्थ्यांची भेट घेत त्या नाशिककडे रवाना झाल्या. यावेळी त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर, जिल्हा प्रभारी आ. संजय केळकर, यात्रा प्रमुख डॉ. अशोक उईके, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सुजित पाटील, युवाध्यक्ष समीर पाटील,नगरसेवक भावानंद संखे, अरुण माने, अशोक अंबुरे, प्रमोद आरेकर, आदी उपस्थित होते.