ठाणे : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण होत आहे. या कालावधीत होणारा पाऊस, अतिवृष्टी, वाऱ्याचा वेग, वीज कोसळणे, झाडे कोसळणे, वाहतूक व्यवस्था ठप्प होणे, विद्युत पुरवठा खंडित होणे याबाबत योग्य त्या उपाययोजना त्वरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत.
किनारपट्टीलगत व सखल भागात वास्तव्यास असणाऱ्या कच्च्या घरांमधील रहिवासी, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. सहायक आयुक्त, मत्सव्यवसाय ठाणे, पालघर यांनी मच्छिमार संघटनांद्वारे उत्तन व आसपासच्या मच्छिमारांना समुद्रामध्ये मासेमारीकरिता मज्जाव करावा व समुद्रात गेलेल्या बोटी तत्काळ नजीकच्या किनाऱ्याजवळ पोहोचल्याबाबत खात्री करावी. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील उत्तन परिसरामध्ये आयुक्त, मिरा भाईंदर, अपर तहसीलदार मिरा भाईंदर यांनी विशेष लक्ष ठेवून तातडीने उपाययोजना करण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.