ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (टीडीसीसी) विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँक निर्माण करावी, या प्रमुख मागणीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मनमानीविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शेकडो शेतकरी व आदिवासींनी एकत्र येऊन निदर्शने केली. वाहतूककोंडी व कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ठाणे, पालघर जिल्ह्यांतील गावपाड्यांतील शेकडो कार्यकर्ते, शेतकरी व आदिवासीबांधव वाहनांद्वारे ठाणे शहरात ठिकठिकाणी आले. त्यानंतर, शासकीय विश्रामगृहासमोर एकत्र येऊन त्यांनी ही निदर्शने केली. सुमारे १५ दिवसांपूर्वी येथील गावदेवी मैदानावरून हा मोर्चा निघणार होता. परंतु, त्यावेळीदेखील पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नव्हती. शुक्रवारीदेखील या मोर्चाला शहरातील वाहतूककोंडी, विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेजच्या परीक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे महिलांसह शेकडो आंदोलनकर्त्यांनी कोकण विकास मंचचे संचालक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार धरणे दिले.या वेळी काँग्रेसचे माजी खासदार दामू शिंगडा, एकनाथ गायकवाड आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करून टीडीसीसी बँकेच्या पारदर्शक कामकाजाची मागणी केली. भिवंडी-मनोर महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी बांधकाम खात्यावर ताशेरे ओढले.या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी लावून धरली. या वेळी टीडीसीसी बँकेचे विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करावी, या प्रमुख मागणीसह विविध स्वरूपांचे आरोपही करण्यात आले.यामध्ये बँकेच्या नोकरभरतीत शैक्षणिक पात्रता, जात, संवर्ग, वय व एकूण सेवा या निकषांच्या आधारे पदोन्नती मिळणे अपेक्षित असतानाही नियमबाह्य पद्धतीने दिलेली पदोन्नती रद्द करावी. संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई करावी. संचालक व व्यवस्थापकांचे जे नातेवाईक बँकेची नोकरी करत आहेत, त्यांना तत्काळ निलंबित करावे.
जिल्हा बँकेचे विभाजन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:36 AM