ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामधील संगम ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ब्राम्हणवाडी येथे १७ वर्षीय बालिकेचा विवाह शनिवारी करण्यात येत होता. याची खबर मिळताच जिल्हा बालसंरक्षण कक्षाने हे कार्यक्रमस्थळ गाठून हा लग्नसमारंभ रोखला.
मुरबाड पोलिसांच्या सहकार्याने जिल्हा बालसंरक्षण कक्षाने ग्राम बालसंरक्षण समिती, अंगणवाडीसेविका व चाइल्ड लाइन यांच्या मदतीने हा बालविवाह थांबवण्यात आला. मुलीच्या कुटुंबाकडून या मुलीचे वय वर्षे १८ पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्यासाठी बंधपत्र लिहून घेतले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महिंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांच्या समन्वयासह संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, रोहिणी शिरसाठ यांच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात आला.