डोंबिवली : खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यातून साकारलेल्या कळवा स्थानकातील वन रुपी क्लिनिकचे लोकार्पण सोमवारी खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या खासदारांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचे ब्लड प्रेशर तपासून या वन रुपी क्लिनिकचे उद्घाटन केले, त्यावेळी उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली.
मुंबईतील उपनगरी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी कुठलीही सोय नसल्यामुळे खा. डॉ. शिंदे सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करत होते. विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे येथील अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळेच या ठिकाणी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष असावेत, यासाठी स्वतः डॉक्टर असलेले खासदार शिंदे पाठपुरावा करत होते. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, मुंब्रा येथे गेल्या काही वर्षांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू झाले, तर सोमवारी कळवा येथील वन रुपी क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.
या आपत्कालीन वैद्यकीय कक्षांचा मोठ्या प्रमाणावर लाभ प्रवाशांना होत आहे. ठाणे स्थानकातील वैद्यकीय कक्षात तर अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत गर्भवती महिलांची यशस्वी प्रसुती देखील करण्याचे काम तेथील डॉक्टरांनी केले आहे. अपघातानंतर तातडीने मदत मिळाली तर रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. अशा या गोल्डन अवरमध्ये आवश्यक उपचार मिळण्याची सोय या वन रुपी क्लिनिकमुळे उपलब्ध होणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, महिला संघटक लता पाटील आदी उपस्थित होते.