ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील महिला वॉर्डच्या छत्राचे पीओपी पडल्याचा धसका घेऊन भविष्यात रुग्णालयात एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट न पाहता हे रुग्णालय तातडीने एचपीडब्ल्यूटीसी आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे स्थलांतर करण्याबाबत परवानगी मिळावी,असा नवा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने तयार करून तो मंत्रालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर यापूर्वीचा स्थलांतरासाठी वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पीटल मिळावे, हा प्रस्ताव अद्यापही केंद्र शासनाच्या दरबारी पडून आहे.रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महिला वॉर्ड आहे. या वॉर्डच्या छत्राचे प्लास्टर (पीओपी) अचानक कोसळले. यावेळी वॉर्डात तब्बल १९ रूग्ण (नवजात बालक आणि माता) होते. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. रात्रीच्या वेळेस अचानक प्लास्टर पडल्यानंतर, रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांवर प्रचंड घबराट पसरली होती. यावेळी नवजात बालकांना घेऊन रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांनी तळ मजला गाठून तेथे तंबू ठोकून बसले होते. पुन्हा त्या वॉर्डात जाण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी विरोध दर्शवल्याने त्यांना अन्य वॉर्डमध्ये रात्रीच हलविले. त्यानंतर, जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी वारंवार अशाप्रकारे घडणाऱ्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय जेवढ्या लवकरात लवकर स्थलांतरीत करता यावे, यासाठी आठ दिवसात शहरातील पाच रुग्णालयांची पाहणी केली.त्यामध्ये केंद्र -राज्य आणि महापालिकांच्या रुग्णालयांचा समावेश आहे. त्यातील वागळे इस्टेट, मनोरूग्ण रुग्णालयाजवळील एचपीडब्ल्यूटीसी आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्र हे दोन्ही रुग्णालय आजूबाजूला असल्याने आणि जवळपास १२८ बेडचे असल्याने त्याला पहिली पसंती दिली आहे. त्यानुसार,जिल्हा सामान्य रुग्णालय येथे स्थलांतरीत होऊ शकते. तर, रुग्णालयाची सद्यस्थिती पाहता, रुग्णालय तत्काळ हलवणे गरजे आहे. त्याप्रमाणे नवा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने तयार करून तो मंत्रालयात सादर केला आहे. तसेच या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यास येथे काही विभाग हलवण्यात येणार आहे. उर्वरित विभागात अपघात विभाग अन्य इमारतीत सुरू राहतील असेही सूत्रांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालय स्थलांतराचा नवा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:18 AM