ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जाणवत होता. त्यातही १२ दिवसांत केवळ दोनवेळाच जिल्ह्याला ९९ हजार लसी मिळाल्या होत्या. त्यानंतर आता जिल्ह्याला तब्बल १ लाख ९ हजार ४०० लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात पुढील दोन ते दिवस लसीकरण सुरळीत सुरू राहिले.
जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला वेगाने मोहीम सुरू होती. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन, हेल्थवर्कर यांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर नागरिकांचेही लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत जिल्ह्यात २६ लाख ५५ हजार ३२२ जणांचेच लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये १८ लाख ७२ हजार ६१० जणांना पहिला, तर केवळ ७ लाख ८२ हजार ७१२ जणांनाच दुसरा डोस देण्यात आला आहे.
मागील महिन्यापासून लसीकरणाचा वेग फारच मंदावला. आठवड्यातून एक ते दोन वेळाच लसीकरण झाले. मध्यंतरी पावसाचे कारण देत लस मिळत नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. परंतु, त्याच कालावधीत किंबहुना आतादेखील खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. खासगी रुग्णालयांना लस मिळतात आणि शासकीय यंत्रणांना लस मिळत नाहीत, यावरूनदेखील सध्या वादंग सुरू आहे. त्यातही मागील १२ दिवसांचा विचार केल्यास जिल्ह्याला केवळ दोनवेळाच लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तोदेखील तुटपुंजा असून, या कालावधीत केवळ ९९ हजार लसींचा साठा जिल्ह्याला मिळाला आहे.
दरम्यान, आता सहा दिवसानंतर पुन्हा जिल्ह्यासाठी १ लाख ९ हजार ४०० लसींचा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. हा साठा आता दोन ते तीन दिवस पुरेल अशी चिन्हे दिसत आहेत. परंतु, तोपर्यंत नवीन साठा उपलब्ध झाला नाही तर पुन्हा मोहिमेला ‘खो’ बसणार आहे.
पालिका - कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन
ठाणे - २२००० - २१००
केडीएमसी - १९००० - १८००
नवी मुंबई - १५००० - १४००
मीरा भाईंदर - ११००० - ११००
उल्हासनगर - ५००० - ४००
भिवंडी - ७००० - ६००
ग्रामीण - २१००० - २०००
-------------------------------------------------------------
एकूण - १००००० - ९४००