लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनातून सावरलेल्या लहान मुलांमध्ये आता एमएसआयसी म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा धोका वाढला आहे. याबाबत आता ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागाचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका संभवू शकणार असल्याने त्या दृष्टिकोनातून देखील जिल्हा आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ६५ बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन त्यांना ट्रेनिंगही दिले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
कोरोनातून सावरल्यानंतर आता लहान मुलांमध्ये एमएसआयसी या आजाराचा धोका वाढताना दिसत आहे. कारण कोरोनातून बरे होत असताना लहान मुलांच्या शरीरावर त्याचे परिणाम दिसून येत असतात. त्यामुळे अशा मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनातून बरे होण्यासाठी मुलांना वेळ लागत असतो. त्यामुळे त्यांच्या स्नायूंवर देखील याचा परिणाम होऊन त्याचा फटका लहान मुलांना बसल्याचे दिसून आले आहे. त्यातही मुलांमध्ये रिकव्हरीला खूप अडचणीदेखील निर्माण होताना दिसत आहेत.
आता संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन तसेच एमएसआयसी आजाराचा धोका लक्षात घेऊन बुधवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ६५ बालरोग तज्ज्ञांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यांना विविध स्वरूपाचे ट्रेनिंगदेखील दिले आहे. तसेच इतर डॉक्टरांनाही ट्रेनिंग दिले जाणार असून, लहान मुलांना यातून सावरण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करणे गरेजेचे आहेत यावर चर्चा केली आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ५,२९,३३८
बरे झालेले रुग्ण - ५,१३,०२६
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ४,३५८
कोरोना बळी - १०,५४८
जिल्ह्यात शून्य ते १० वयोगटातील १९,८०६ बालकांना कोरोनाची लागण
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून आतापर्यंत १९ हजार ८०६ बालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे, तर केवळ १२ बालकांचा यात मृत्यू झाला आहे. परंतु, यातील बहुसंख्य बालके कोरोनामुक्त झाली असून, त्यांचे आरोग्य योग्य असल्याचे सांगितले जात आहे.
-अशी आहेत लक्षणे
मुलांना खूप ताप येणे. तो पाच दिवसांपर्यंत कमी न होणे. मुलांच्या सतत पोटात दुखणे. मळमळ, उलट्या होणे. त्वचेवर ओरखडे पडणे, डोळे लाल होणे, अशी काही प्रमुख लक्षणे यात दिसून येत आहेत.
ही घ्या काळजी -
मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नका, कुठलेही लक्षण आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा, कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडेही लक्ष ठेवावे.
.........
कोरोनातून बरे झालेल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरेजेचे आहे. तसेच लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक म्हटली जात आहे. त्यानुसार शक्यतो मुलांना घराबाहेर पाठवू नये, बाहेर गेल्यास तोंडाला मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ नये. सतत हात साबणाने धुवावेत तसेच घरच्यांनीदेखील त्यांची विशेष काळजी घ्यावी.
(कैलास पवार - जिल्हा शल्यचिकित्सक - ठाणे )