ठाणे : मागील जवळजवळ दीड वर्षांहून अधिक काळ कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात खासगी रुग्णालयातील खर्च न परडवणारा आहे. परंतु, अशातही ठाण्यातील खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयांनी महात्मा फुले आरोग्य योजना राबवून अनेक रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले. यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने मागील दीड वर्षांत या योजनेंतर्गत एक हजार ११५ रुग्णांना याचा लाभ देऊन जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात अव्वल स्थान मिळविले आहे. याची दखल घेऊन या रुग्णालयाला कांस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कांस्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय कोविड रुग्णालयातील उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालय येथे १३२, मध्यवर्ती रुग्णालयात २४, प्रादेशिक मनो रुग्णालयात ३८, ग्रामीण रुग्णालय शहापूर येथे पाच तर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात ६४३ रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.