- पंकज रोडेकर ठाणे : जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना दिवसातून सफरचंद, संत्री आणि मोसंबी या पैकी एक फळ दिले जाते. मात्र, लॉकडाउनमुळे बाजारपेठेत पुरेशी फळे उपलब्ध होत नसल्याने टंचाई सुरू आहे. यामुळे फेसबुकच्या मदतीने नाशिक येथे सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेली मोसंबी माफक दरात प्र्रशासनाने उपलब्ध केली आहे. यामुळे रुग्णांसह शेतकºयाला ही दिलासा मिळणार आहे.
फेसबुकवरील पोस्टधारकांशी संपर्क करून ते ठाण्यात उपलब्ध होतील का, याची खातराजमा केल्यावर त्यांच्याकडून २०० किलो मोसंबीची मागणी केली. यासाठीचा खर्च रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करणाºया अन्नदात्यांनी उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाºया रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात असल्याची थाप चक्क केंद्रीय आरोग्य पथकाने मारली आहे. रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात २०० रुग्णांचे जेवण तयार करण्यात येते.
जेवणाबरोबर रुग्णांना दररोज एक फळ वाटप केले जाते. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यापासून बाजारपेठेत फळांची कमतरता भासत आहे. रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ प्रिया गुरव यांना फेसबुकवर श्यामला चव्हाण यांनी नाशिकमध्ये सेंद्रिय पद्धतीने मोसंबीची लागवड करून तिचे मोठ्याप्रमाणात पीक आल्याचे म्हटले. ती मोसंबी माफकदरात असून कोणाला हवी असेल तर संपर्क करण्याचे आवाहन केले होते.
फळांची गरज लक्षात घेऊन ही बाब गुरव यांनी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने मोसंबी मागविण्यास सांगितले. दरगुरुवारी रुग्णांना फळवाटप करणारे आशिदा इलेक्ट्रॉनिकचे सुयश कुलकर्णी यांनी २०० किलो मोसंबीचा ३० रुपयांप्रमाणे खर्च उचलला आहे. रुग्णालयातील रुग्णांना फळे उपलब्ध होत नसल्याची बाब ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर पडताच त्यांनीही तातडीने १५ पेट्या उपलब्ध करून दिल्या.
बोईसरहून मागवले ३०० नग ताडगोळे
रुग्णालयातील रुग्णांसह कर्मचाऱ्यांसाठी १५ मे रोजी पालघरमधील बोईसर येथून ३०० नग ताडगोळे मागवले होते. ३०० नग पुन्हा मागवले आहेत. ते राजश्री शाहू नागरी सेवा संस्थेचे संचालक जनार्दन चाधने यांच्या सहकार्यातून उपलब्ध झाले आहेत.