ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने शिरकाव केल्यानंतर एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. याची गांभीर्याने दाखल घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड १९ रुग्णालयात रूपांतर केले. त्या दिवसापासून ते आतापर्यंत या रुग्णालयात केवळ कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यानुसार ६ एप्रिल २०२० ते २५ एप्रिल २०२१ या वर्षभराच्या कालावधीत पाच हजार १३७ कोरोनाबाधितांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी चार हजार ६६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामध्ये १०५ नवजात बालकांचादेखील समावेश आहे.
कोविड रुग्णालय घोषित होण्यापूर्वी या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांचे ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्थलांतरित केले. त्यानंतर सुरुवातीला केवळ २०० बेड्सच्या माध्यामतून सुरू केलेल्या या कोविड रुग्णालयात मिळणाऱ्या योग्य उपचारांसह माणुसकीचा मिळणारा आधार या सर्व बाबींमुळे जिल्हा रुग्णालयाकडे रुग्णांचा ओढा वाढत गेला. कालांतराने येथील रुग्णांच्या तुलनेत बेड्सची संख्या अपुरी पडू लागल्यामुळे त्यात वाढ करून ३०० बेड्स करण्यात आले. त्यानुसार ६ एप्रिल २०२० ते २५ एप्रिल २०२१ या वर्षभराचा कालावधीत पाच हजार १३७ कोरोनाबाधितांना येथे दाखल करण्यात आले होते. यापैकी चार हजार ६६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, हे रुग्णालय कोविड १९ रुग्णालय घोषित केल्यानंतर या ठिकाणी सामान्य रुग्णांसह गरोदर माता, डायलेसीसवरील रुग्ण, नवजात बालक यांच्यासह मनोरुग्णांवरदेखील उपचार करण्यात येत असतात. त्यानुसार आतापर्यंत १०५ नवजात बालकांवर उपचार करण्यात आले. त्याबरोबर डायलेसिसवरील १४८, तर मनोरुग्णालयातील ५७ मनोरुग्णांवर उपचार केल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
गरोदर मतांसाठी माहेरघर
कोरोनाबाधितांमध्ये एखाद्या गरोदर महिलेची प्रसूती करण्याची वेळ आल्यावर अशा महिलेच्या प्रसूतीसाठी शस्त्रकियेसह नॉर्मल प्रसूतीची चोख व्यवस्था केली गेली. नवजात बाळाला आवश्यक असलेला 'एसएनसीयू' विभागदेखील तयार केला आहे. त्यानुसार वर्षभरात १०१ गरोदर मतांची सुखरूप प्रसूती केली आहे. यामध्ये ७८ नॉर्मल, तर २३ सिझर प्रसूती केल्या असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच गरोदर आणि बाळंतिणींसाठी जिल्हा कोविड रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार केला आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या त्या गरोदर महिलांच्या डिलिव्हरीसाठी डॉ. अर्चना आखाडे आणि डॉ. स्वाती पाटील या दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे.