नंडोरे : राज्य लेखा कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हासही ‘समान न्याय समान संधी’ मिळण्यासाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचाऱ्यांनी राज्यभर टप्पानिहाय आंदोलनानुसार बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी काळ्या फिती लावून लेखणीबंद आंदोलन करून निषेध करण्यात आला. दीर्घकालीन प्रलंबित दहा मागण्यासंदर्भात हे आंदोलन सुरु केले असून यामध्ये जिल्हा सेवा वर्ग ३ मधील श्रेणी १ मध्ये असलेल्या पदांना राजपत्रित दर्जा, ग्रेड पे मिळणे, पंचायत समितीस्तरावर इंदिरा आवास व मनरेगा योजनेत लेखाधिकारी पद निर्माण करणे, उपलेखापाल व लोकसेवा आयोगाची लेखा वित्त सेवा वर्ग ३ च्या परीक्षा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे स्पर्धा परीक्षा जाहीर करा, जि.प तील लेख कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रशिक्षण, गट स्तरावर सहा. लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार देण्यात यावेत, जि. प अंतर्गत लेखा कर्मचाऱ्यांचे जॉब चार्ट तयार करणे व पं .स. स्तरावर लेखा अधिकारी २ चे पद निर्माण करणे या मागण्या संघटनेने शासन दरबारी केलेल्या आहेत. १० तारखेपासून राज्यभरात सुरु झालेल्या या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले तर बुधवारी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर या आंदोलनास मोठे स्वरूप देऊन आमरण उपोषण करण्याचा इशाराही जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने दिला आहे.(वार्ताहर)
जि. प. कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
By admin | Published: March 17, 2017 5:44 AM