ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ जिल्ह्यातील सर्वच पालिका प्रशासनावर ओढवली असली तरी एकट्या जून महिन्यात नऊ वेळा लस प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये तीन लाख ८४ हजार २०० कोविशिल्ड, तर ४१ हजार ५६० कोव्हॅक्सिन अशा चार लाख २५ हजार ७६० लसींचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी कोरोना या आजाराने पुन्हा आपले डोके वर काढले होते. मात्र, मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्यातही आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत आजही चढउतार होत आहे. त्यात आता, पुन्हा तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिक लसीकरण केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र, अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.
दुसरीकडे, एकाच दिवशी विक्रमी लसीकरण करणाऱ्या ठाणे महापालिकेला लसींच्या साठ्याअभावी केंद्रे बंद करण्याची वेळ ओढवलेली आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महापालिका क्षेत्रांमध्येदेखील अपुऱ्या लसींमुळे केंद्र बंद ठेवली आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशी तर लस मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात एकट्या जून महिन्यात नऊ वेळा लस प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तीन लाख ८४ हजार २०० कोविशिल्ड, तर ४१ हजार ५६० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.
जिल्ह्यात अवघे २२ लाख लसीकरण
जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात २१ लाख ९५ हजार १४८ जणांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १७ लाख ७० हजार ६४५ जणांना पहिला डोस तर, चार लाख २४ हजार ५०३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केलेेेेेेेेेे आहे.