भिवंडी : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी भिवंडीतील सवाद येथे ८१८ खाटांच्या भव्य जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, आ. शांताराम मोरे, आ. रवींद्र फाटक, आ. विश्वनाथ भोईर, माजी आ. पांडुरंग बरोरा, जि. प. उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, तहसीलदार अधिक पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिपचे सीईओ भाऊसाहेब दांगड, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, जिप आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे आदी उपस्थित होते. या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांना रोबोटद्वारे पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमावेळी रोबोट आकर्षणाचा विषय ठरले होते. तर या रुग्णालयातही रोबोटचा वापर होणार आहे.भिवंडी-कल्याण रस्त्यावरील सवाद ग्रामपंचायत क्षेत्रातील गोदाम बांधकामाची निवड या रुग्णालयासाठी केल्याने त्याचा फायदा भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड या तालुक्यातील रुग्णांना होईल, असे नार्वेकर यांनी प्रस्ताविकेत सांगितले.सवाद येथील जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय दोन लाख ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर साकारले आहे. या रुग्णालयात महिलांसाठी ३६०, पुरुषांसाठी ३७९ ऑक्सिजन बेड आहेत. तर, ८८ अतिदक्षता बेड असून त्यात २० व्हेंटिलेटर, २० बायपॅक व ४० हायफ्लो नॅशल कॅनॉल सुविधा असे ८१८ बेड आहेत. रुग्णालयातील सर्व साहित्य हे आगरोधक असून, हे पुनः वापरात येणारे आहे. रुग्णांसाठी योगाभ्यास, करमणुकीसाठी कॅरम, दूरदर्शन संच, रुग्णांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी १० टॅब आहेत. त्याद्वारे ते व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी संवाद साधू शकणार आहेत. रुग्णालय परिसरात ७५ सीसीटीव्ही असून त्याच्या नियंत्रणासाठी कंट्रोल रूम आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी तीन ऑक्सिजन टँक आहेत. रुग्णालयातील शौचालयही ऑक्सिजनयुक्त आहेत. रुग्णांसोबत काम करणारे डॉक्टर, नर्स यांचा थेट संपर्क येणार नाही, यासाठी वेगळा ‘नर्स वे’ बनविला आहे. तेथे पीपीई किट्स न घालता वेगळ्या वातावरणात त्यांना राहता येणार असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण राहणार नाही. ‘ग्रामीण रुग्णालयात रूपांतरित करणार’ सुरुवातीला कोरोना संकटावर मात करताना अनेक अडचणी आल्या. नागरिकांना बेडची कमतरता जाणवत होती. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी हे सुसज्ज जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय उभारण्यात आले. त्याकरिता राज्याच्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद केली. भविष्यात कोविडचा धोका टळल्यानंतर हे रुग्णालय जिल्हा ग्रामीण रुग्णालयात निश्चितच रूपांतरित करण्यात येईल, अशी घोषणा या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच अंबरनाथ येथे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
भिवंडीतील सवाद येथे ८१८ बेडचे जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 1:08 AM