प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २००७ ची सरळसेवा परीक्षा देवून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले विकास गजरे यांनी नुकताच कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित लोहपुरूष ट्रायथलॉन या स्पर्धेत “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” बनण्याचा पराक्रम केला होता. त्यांनी गोव्यात “आयर्न मॅन ट्रायथलॉन” या जागतिक पातळीवरील स्पर्धेतही दैदिप्यमान कामगिरी करीत स्वत:ला पुन्हा एकदा “आयर्न मॅन” म्हणून सिध्द केले आहे.
या यशाबद्दल त्यांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्यांचे कौतुक केले आहे. यापूर्वी कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित “लोहपुरूष ट्रायथलॉन” या स्पर्धेत गजरे यांनी कोल्हापूरच्या प्रसिध्द राजाराम तलावात १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लगेचच कोल्हापूर-बॅंगलोर महामार्गावर ९० किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ३.२१ किलोमीटर (अर्ध मॅरेथॉन) पूर्ण करणे, अशा तीन टप्प्यात असलेली स्पर्धा ८ तास २५ मिनिटात यशस्वीपणे पूर्ण करुन “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” चा किताब पटकाविला होता. गोव्यात संपन्न झालेल्या या स्पर्धेत ५० देशांतील विविध ठिकाणाहून एकूण ७८७ स्पर्धक सहभागी झाले हाते.
जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत समुद्रात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालविणे आणि २१.१ किमी धावणे या बाबींचा समावेश होता. स्पर्धकांसमोर ११२.९ किमी अंतराची ही स्पर्धा ८ तास आणि ३० मिनिटात पूर्ण करण्याचे आव्हान होते. स्पर्धेचा प्रारंभ मिरामार येथे झाला होता. यापैकी ५१७ स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. जवळपास ३४ टक्के स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करु शकले नाहीत. मात्र अशा या जगातील अत्यंत अवघड असलेली, आव्हानात्मक, शरीर आणि मनाच्या ताकदीची कसोटी पाहणारी “आयर्न मॅन ट्रायथलॉन” स्पर्धा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी गजरे यांनी अवघ्या ८ तास ८ मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी या स्पर्धेत वयानुसार असलेल्या गटातून ८८ वा तर पुरुष गटातून ४६८ वा क्रमांक पटकाविला.