ठाणे : कोरोनावर परिणामकारक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत आहे. मात्र, या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण भटकावे लागू नये, यासाठी ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यालयाने सुरू केलेल्या रेमडेसिविर संनियंत्रण समितीतर्फे खासगी कोविड रुग्णालयांना हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान, सध्या रुग्णालयांकडून या इंजेक्शनची होणारी मागणी आणि पुरवठा, यात मोठी तफावत असली तरी येत्या तीन ते चार दिवसांत पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तफावत दूर होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. तसेच या आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वणवण फिरूनही इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल होत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात काही ठिकाणी रेमडेसिविरचा काळाबाजार व रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.
त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. रुग्णालयांनीच रुग्णाला रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे, असे सरकारने स्पष्ट केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मागील १० ते ११ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३१ हजार ३१० रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली.
रुग्णालयांना ३१ हजार ३१० इंजेक्शनचा पुरवठा
- जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ५४ हजार रेमडेसिविरची मागणी करण्यात आली आहे. त्यात आतापर्यंत ३१ हजार ३१० इंजेक्शन रुग्णालयांना पुरविण्यात आले आहे.
- मात्र, रुग्णालयांकडून होणारी मागणी आणि त्यांना आतापर्यंत केलेला पुरवठा, यात तफावत आहे. असे असले तरी येत्या तीन ते चार दिवसांत रेमडेसिविरचा पुरेसा साठा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शनसाठी होणारी परवड थांबणार आहे.
--------------