पालघर : मुंबईमधील धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर जम्मू-काश्मीर येथील स्पर्धेसाठी निवड झालेल्या विशाल पारधी या आदिवासी मुलाचा वेग घरच्या गरिबीमुळे रोखण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख वैभव संखे यांनी त्याची आर्थिक गरज पूर्ण केल्याने आपण स्पर्धेत सुसाट धावत जिल्ह्यासाठी प्रथम क्रमांकाचे पदक मिळविणार, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील उधवा येथील विशाल पारधी याने मुंबईमधील ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यामुळे त्याची निवड जम्मू-काश्मीर येथील धावण्याच्या स्पर्धेसाठी झाली आहे. मात्र, त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे बूट आणि प्रवासाचा, राहण्याचा खर्च त्याला पेलता येणे शक्य नव्हते. त्याच्या ध्येयाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. आदिवासीबहुल भागातील बांधवांनी जमा केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असल्याने त्याचे मनोधैर्य खचत चालले होते. यावेळी काही तरुणांनी पालघर विधानसभेचे संपर्कप्रमुख वैभव संखे यांच्या कानी विशालची कैफियत मांडली. त्यांनी तात्काळ आपल्या घरी बोलावून त्याच्या हाती रोख रक्कम सुपूर्द करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले. तुझ्या यापुढील स्पर्धेत शिवसेना नेहमीच तुझ्यासोबत असेल, असा विश्वास संखे यांनी विशालला देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत कोलवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता चिंतामण संखे, उपसरपंच प्रदीप पाटील, सचिन पिंपळे, रणजित कोम उपस्थित होते.
जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळण्यासाठी धावणार, जम्मू काश्मीरच्या स्पर्धेसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 12:51 AM