ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी रुग्णसंख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी दिवसभरात तीन हजार ८२० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता चार लाख ६० हजार ७५ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सात हजार ४६६ झाली आहे. रुग्णसंख्या कमी होऊ लागली असली मृत्यूंची संख्या सतत वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
ठाणे शहर परिसरात ९७१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख १७ हजार ३७० झाली आहे. शहरात १५ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या एक हजार ६४७ झाली आहे. तर कल्याण-डोंबिवलीत एक हजार ९१ रुग्णांची वाढ झाली असून नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ६३४ रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १४० रुग्ण सापडले असून चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत ३९ बाधित असून शून्य मृत्यूंची नोंद आहे. मीरा-भाईंदरमध्ये ३७७ रुग्ण आढळले असून तब्बल नऊ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १२५ रुग्ण आढळले असून पाच जणांच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १७८ रुग्णांची नोंद झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २६५ नवे रुग्ण वाढले आहेत. तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या २६ हजार १०६ झाली असून आतापर्यंत ६८० मृत्यूंची नोंद आहे.