- अजित मांडके ठाणे : दिवा येथे रेल्वे रूळ ओलांडताना सोमवारी दोघांचा एक्स्प्रेसने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यात याठिकाणी २० जणांचे बळी गेल्यामुळे या रेल्वे क्रॉसिंगवरील आरओबीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. येथील रहिवासी आता पुन्हा याबाबत आक्रमक झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या महासभेत आरओबीला मंजुरी मिळालेली असून त्यासाठी ४० कोटींची तरतूदही केली आहे. परंतु, रेल्वेकडून इस्टिमेट न आल्याने हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. दुसरीकडे येथील पाच इमारती आरओबीसाठी तोडण्यात येणार असून तेथील २५० रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी अद्याप इतर ठिकाणी पर्याय उपलब्ध न झाल्यानेही हे कामही रखडले आहे.सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास दुचाकीवरून रेल्वे रूळ क्रॉस करत असताना दोघा तरुणांचा एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. त्यामुळे येथील रहिवासी आक्रमक झाले होते. याठिकाणी आरओबी व्हावा, यासाठी मागील कित्येक वर्षांपासून येथील रहिवासी पाठपुरावा करत आहेत. तसेच दिवा रेल्वे प्रवासी संघटनेकडूनदेखील वारंवार पालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही त्यांच्या मागणीचा विचार झाला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. रेल्वे रूळ क्रॉस करताना महिन्याला सुमारे १० जणांचा बळी जात असल्याचा दावादेखील प्रवासी संघटनेने केला आहे. म्हणजेच वर्षाला सुमारे १०० जणांचा येथे नाहक बळी जात असल्याचे स्पष्ट होत आहे.दिव्याची लोकसंख्या ४.५० लाखांच्या घरात असून यातील अर्ध्याहून जास्तीची लोकसंख्या ही पूर्वेला वास्तव्यास आहे. त्यातही याठिकाणी जो रेल्वे ब्रिज आहे, तो पूर्वेला उतरताना निमुळता आहे. याचे डिझाइन चुकल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास येथून उतरताना जास्त वेळ लागत असल्याने प्रवासीदेखील नाइलाजास्तव रेल्वे रूळ क्रॉस करताना दिसतात. तर, मध्यभागी सध्या सरकत्या जिन्याचे काम सुरू आहे. परंतु, तो जिना पूर्वेलादेखील खाली उतरवण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
दिवा क्रॉसिंगने घेतले सहा महिन्यांत २० बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 2:25 AM