ठाणे : दिवा डम्पिंग बंद झाले असले तरी अजही त्याठिकाणाहून धूर निघत आहे. त्यामुळे आता दिवा डम्पिंग कायमचे बंद करुन पूर्वी जशी जमीन होती, तशीच जमीन देण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने याचा सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. यासाठी सुमारे ६५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यासाठी ४० कोटींचा खर्च केंद्राकडून अपेक्षित धरण्यात आला आहे. तर महापालिका त्यात २५ कोटींचा खर्च करणार आहे. परंतु दीड वर्षानंतर मोकळ्या होणाºया या जागेवर आतापासूनच अनेकांनी हक्क सांगण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे भविष्यात ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन संघर्ष पहावयास मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील कित्येक वर्षापासून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिवा येथील क्षपण भुमीवर कचरा टाकला जात होता. याठिकाणी रोजच्या रोज सुमारे १ हजार मेट्रीक टन कचरा टाकला जात होता. आता मागील काही महिन्यापासून येथील डम्पिंग कायमचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दिवेकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून येथे कचरा टाकला जात असल्याने आजही येथे धुराचे लोळ उडतांना दिसत आहेत. त्यातही याठिकाणी मिथेन वायुचे प्रमाणही अधिक प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे डम्पिंग बंद झाले असले तरी येथील लोकांचा त्रास काही कमी झालेला नाही.
येथील डम्पिंग कायमचे बंद झाल्यानंतर येथील कचऱ्याची शास्त्रक्तोपद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या हालचाली पालिकेने केल्या आहेत. त्यानुसार या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी दिड वर्षाचा कालावधी जाण्याची शक्यता असल्याचे पालिकेने सांगितले. त्यानुसार त्याचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी तब्बल ६५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यातील ४० कोटी केंद्र सरकारकडून आणि २५ कोटी पालिका खर्च करणार आहे. याठिकाणी आजच्या घडीला ११ लाख मेट्रीक टन कचरा असल्याचा दावाही पालिकेने केला आहे. दिड वर्षानंतर ही जमीन पूर्वी जशी होती तशीच मोकळी करुन दिली जाणार आहे.
असे असले तरी देखील आतापासून या जमीनीवर अनेकांनी हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाने देखील ही जागा आपली असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे काही नागरीकांनी देखील यातील जमीन आपली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या जागेसाठी आतापासूनच संघर्षाची ठिणगी पडण्यास सुरवात झाली आहे. परंतु दीड वर्षानंतर ही जागा कोणाची आहे, त्यावर कोणा कोणाचा हक्क असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.