ठाणे : पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर आता ठाण्यातून कल्याण जिल्हा हा वेगळा करावा अशी मागणी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केली. तसेच या संदर्भातील ठराव देखील करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. मात्र पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी अशा पध्दतीने या बैठकीत तसा ठराव करता येणार नसल्याचे सांगितले. या संदर्भात सर्व पक्षीयांशी चर्चा करुन वरीष्ठांशी चर्चा करुन त्यानुसार पुढील निर्णय घ्यायचा की नाही? हे निश्चित करता येईल असे स्पष्ट केले.
ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा होत असतांना त्याच वेळेस कल्याण जिल्हाही वेगळा करावा अशी मागणी लावून धरण्यात आली होती. परंतु अद्यापही त्याला फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. कल्याण ते थेट कर्जत पर्यंत हा जिल्हा असावा असेही यात नमुद करण्यात आले आहे. कर्जत मधील नागरीकांना आपल्या विविध गोष्टींसाठी किंवा शासकीय कामांसाठी अलिबागला जावे लागत आहे. त्यामुळे तो फार लांबचा फेरा पडत आहे. त्यामुळे कल्याण जिल्हा झाल्यास रेल्वेची सुविधा असल्याने येथील नागरीकांना देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्या अनुषगांने ही मागणी करण्यात आली होती.
त्यातही कल्याणमध्ये सर्व सोई सुविधा आहे, याच ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आहे, न्यायालय आहे. बाजारपेठ असून कृषी उत्पन्न बाजार समिती देखील या ठिकाणी आहे. त्यातही दळण वळणाची रेल्वेसह इतर साधणे देखील उपलब्ध आहे. याशिवाय मागील काही वर्षात येथील लोकसंख्या वाढली असून सोई सुविधांवर देखील ताण येऊ लागला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या धर्तीवर कल्याण जिल्हा करण्यात यावा अशी मागणी लावून धरण्यात आली आहे.दरम्यान सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी कल्याण जिल्ह्याची मागणी लावून धरली. तसेच या संदर्भातील ठराव देखील याच बैठकीत करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.
परंतु अशी पध्दतीने जिल्हा विभाजनाचा ठराव करता येणे शक्य नसल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. यापेक्षा सर्व पक्षीय आमदारांशी चर्चा करुन, वरीष्ठ नेते मंडळी आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन मग त्यावर जो काही योग्य निर्णय घेता येईल तो घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.