ठाणे : ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत दिव्यांग विद्यार्थ्यांनी ठाण्यात अवयवदानाची दहीहंडी फोडली. या मुलांपैकी कोणी राधाच्या तर कोणी कृष्णाच्या वेशभूषेत आले होते. त्यांची वेशभूषा बघ्यांची लक्ष वेधून घेत होती. या उत्सवाचा उत्साह, आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.
बाळ गोपाळ मित्र मंडळसह नारळवाला चाळ, ठाणे व पुनर्जीवन सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी शिवाजी मैदानात हा महोत्सव झाला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी अवयवदानाची ही दहीहंडी फोडून उत्सवाचा आनंद साजरा केला. राधेच्या विशेभूषेतील आठ वर्षांची तृप्ती मखवाना आणि कृष्णाच्या वेशभूषेत आलेली सहा वर्षांची श्रृती ओव्हाळने सर्वांची मने जिंकली. पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेश मढवी, विनायक जोशी, विलास जोशी आणि आयोजक विलास ढमाले यांच्या उपस्थितीत दहीहंडी पूजन करण्यात आले. ही दहीहंडी फोडण्याचा मान महापालिकेच्या जिद्द शाळेला देण्यात आला. त्यानंतर अस्तित्त्व मतीमंद व मुकबधीर मुलांची शाळा, डोंबिवली, कमालिनी कर्णबधीर विद्यालय, ठाणे, झवेरी ठाणावाला, जिव्हाळा मुकबधीर शाळा, हॉलीक्रॉस शाळा या शाळांतील विद्यार्थ्यांनीही दहीहंडी फोडली.