भार्इंदर : पोलीस मित्र असलेले येथील दिव्यांग अशोक तातेर यांनी केलेल्या आत्महत्येस स्टॉल परवाना देण्यास अडवणूक करणारे व कारवाईची धमकी देणारे महापालिकेचे अधिकारी तसेच अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी सोमवारी आ. बच्चू कडू यांच्या प्रहार अपंग क्रांती संघटनेने पोलीस व महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याआधी तोडलेले स्टॉल पालिकेने स्वखर्चाने बांधून द्यावे, अर्थसंकल्पाच्या ५ टक्के राखीव निधी दिव्यांग कल्याणासाठी खर्च करावा, अपंग हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्याही संस्थेने केल्या आहेत. तसेच कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.‘लोकमत’ने या आत्महत्येस वाचा फोडल्यानंतर विविध स्तरातून निषेध होऊ लागला. त्यातूनच प्रहारच्या अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बापूराव काणे, शहर अध्यक्ष श्रीनिवास निकम, तातेर यांच्या पत्नी व मुली यांसह दिव्यांगांच्या शिष्टमंडळाने नवघर पोलिसांना निवेदन दिले. तातेर यांच्या आत्महत्येस पालिकेचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी मागणी साहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्याकडे केली.त्यानंतर शिष्टमंडळाने पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेऊन तातेर आत्महत्येस कारणीभूत अधिकारायांना निलंबित करण्यासह गुन्हा दाखल करावा, तसेच तातेर यांच्या पत्नीस उपजिवीकेसाठी तातडीने सहाय्य करण्यासह स्टॉल परवाना द्यावा असे सांगण्यात आले. आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत या पुढे पदपथ, रस्त्यावर स्टॉल परवाने देता येणार नाही. पालिकेच्या मार्केटमध्ये ५ टक्के गाळे राखीव आहेत. तातेर यांच्या पत्नीस तेथील गाळा वा स्टॉल मिळण्या बाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे त्यांनी आश्वस्त केले. ाहापालिका अधिकाऱ्यांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा
दिव्यांग आत्महत्या : महापालिकेचे अधिकारी तसेच अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 1:38 AM