ठाणे : रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ठाण्यात दिव्यांगबंधन हा अनोखा कार्यक्रम साजरा करण्यात आला. दिव्यांग कला केंद्रातील आपल्या विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून नारळीपौर्णिमा रक्षाबंधनाचा हा सण दिव्यांगबंधन हा दिव्यांग कला केंद्रातील सर्व टीमने साजरा केला.
शनिवारी सायंकाळी तब्बल दीड वर्षानंतर काही दिव्यांग मुले दिव्यांग कला केंद्रात आली. केंद्राच्या प्रमुख संध्या नाकती, रश्मी असाई, परेश दळवी, गौरी यांनी या मुलांकडून राख्या तयार करून घेतल्या. या वेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. याप्रसंगी ठाण्याच्या उपमहापौर पल्लवी कदम व ठाणे परिवहन सभापती विलास जोशी उपस्थित होते. दिव्यांग बंधनाचा एक अगदी भावनिक ऋणानुबंधनाचा कायम मनाच्या कोपऱ्यात जतन करून ठेवावा, असा रक्षाबंधनाचा काही क्षणांचा सुखकर प्रवास सुरू झाला. जोशी यांना दिव्यांग मुलींनी राखी बांधली व उपमहापौर यांनी दिव्यांग मुलांना राखी बांधत सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित वुई आर फॉर यूच्या समस्त स्वयंसेवकांनी आपल्या दिव्यांग बहिणींकडून राख्या बांधून घेत सर्वच जण भावुक झाले. त्यानंतर दिव्यांग कला केंद्रातर्फे सर्वच विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच, गाण्यांच्या तालावर ठेका धरत पार्थ खडकबान, विजय जोशी, अन्मय मेत्री, अविनाश मुंगसे, गौरव जोशी, गौरव राणे, अपूर्वा दुर्गुले, रूपाली विभुते, रेश्मा जेठरा, आरती गोडबोले, जान्हवी कदम या सर्वच दिव्यांग विद्यार्थी कलाकारांनी तीन वेगवेगळ्या नृत्यांवर धम्माल उडवत सर्वांना खूश केले. दीड वर्षांनंतर केंद्रात मुले पुन्हा आली आणि काही काळ हरवलेले त्यांच्या चेहऱ्यावरील हसू पुन्हा बघून मोठे समाधान मिळाले, असे मत किरण नाकती यांनी व्यक्त केले.
फोटो मेलवर