ठाणे : मुंबई उपनगरच्या दिव्यांशी भौमिकने आपली छाप पाडताना मुलींच्या १५ आणि १७ वर्षे वयोगटात बाजी मारत रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब, सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला तर मुलांमध्ये कुशल चोपडाही विजयी ठरला.
१५ वर्षे वयोगटात अव्वल मानांकित दिव्यांशीला ठाण्याच्या काव्या भट्टने कडवी लढत दिली. पाचव्या गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत दिव्यांशीने काव्याचा प्रतिकार ९-११,१२-१४, ११-८, ११-८, १२-१० असा मोडीत काढत स्पर्धेतलं पाहिले विजेतेपद आपल्या नावे केले. १७ वर्ष गटाची अंतिम लढत मात्र दिव्यांशी साठी सोपा पेपर ठरला. या लढतीत दिव्यांशीने पुण्याच्या आनंदीता लुनावतचा ११-९, ११-४, ११-४ असा सहज पराभव करत स्पर्धेतील दुसरे यश नोंदवले. या गटातील मुलांच्या अंतिम लढतीत नाशिकच्या चौथ्या मानांकित कुशल चोपडाने दुसऱ्या मानांकित मुंबई उपनगरच्या शार्वेय सामंतला प्रतिकाराच्या फारशा संधी न देता ११-६, ११-६, ८-११, ११-८ विजेतेपद खिशात टाकले.
स्पर्धेतील इतर अंतिम निकाल : ११ वर्ष वयोगट मुली : आद्या बाहेती (परभणी) विजयी विरुद्ध केशिका पुरकर (नाशिक) ११-९, ११-४,११-८.मुले : राघव महाजन ( मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध आयन आथर (मुंबई उपनगर) ११-०, ११-६,११-६.१३ वर्ष वयोगट मुली : नायशा रेवसकर (पुणे) विजय विरुद्ध आरोही चाफेकर (ठाणे) ११-६, ११-४, ११-३. मुले : प्रतीक तुलसानी (ठाणे) विजयी विरुद्ध झैन शेख (मुंबई उपनगर) ११-३,११-८, १४-१२.१५ वर्षाखालील मुले : पार्थ मगर (मुंबई शहर) विजयी विरुद्ध ध्रुव वसईकर (ठाणे) १०-१२, ११-७, १२-१०, ११-८.