डोंबिवली: प्रख्यात गायक अवधूत गुप्ते, ज्येष्ठ गायिका साधना सरगम, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांच्या गीतांबरोबरच, मानसी नाईक व स्मिता गोंदकर यांची नृत्ये, बालगायिका सई जोशी व नेहा केणे यांची गीते आदींबरोबरच चला हवा येऊ द्या'मधील कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि सागर कारंडे यांच्या विनोदाने दिवाळी पहाट रंगली. खासदार कपिल पाटील यांनी साई चौकात आयोजित केलेल्या दिवाळी पहाटमध्ये तब्बल साडेचार तास सदाबहार कार्यक्रमाने रसिकांना खिळवून ठेवले होते. नागरिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेण्याबरोबरच पारंपरिक फराळाचाही आस्वाद घेतला. गेल्या काही वर्षात कल्याण-डोंबिवली परिसरातील ही सर्वात मोठी दिवाळी पहाट ठरली.गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही खासदार कपिल पाटील यांनी दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत दिवाळी पहाट आयोजित केली. त्यामुळे पहाटे पाचपासूनच कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटे साडेपाच वाजता मैदान पूर्णत: भरुन गेले. त्यानंतर मैदानातील मोकळ्या जागेत व मैदानाबाहेरही रसिक उभे राहिले.साधना सरगम यांच्या गगन तेजोमयने सकाळी सहाच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर बालगायिका सई जोशी-नेहा केणे, शिंदेशाहीतील आदर्श शिंदे, कुशल बद्रिके-श्रेया बुगडे यांच्याबरोबरच सागर कारंडे यांनी सादर केलेले ैहवा येऊ द्या' रसिकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर मानसी नाईक व स्मिता गोंदकर यांच्या लावण्यांसह झालेल्या नृत्याने कार्यक्रम रंगतदार होत गेला. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी गणाधीशा, बाईबाई मनमोराचा, जय जय महाराष्ट्र अशी लक्षवेधी गाणी सादर केली. वैशाली सामंत यांच्या ऐका दाजिबा, कोंबडी पळाली आदी गाण्यांनी कार्यक्रमाने शिखर गाठले.पहाटे सुरू झालेला हा कार्यक्रम ऊन पडल्यानंतरही सुरूच होता. साई चौकातील दजेर्दार कार्यक्रमाची माहिती मिळताच, आठनंतरही रसिकांचे थवे खडकपाड्याकडे येत होते. सकाळी दहाच्या सुमारास ऊन पडल्यानंतरही रसिकांना कार्यक्रमाने खिळवून ठेवले होते. वृद्ध मनात गाणी गुणगुणत होते. तर तरुणाई मैदानात थिरकत होती. अखेर साडेदहाच्या सुमारास कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला रसिकांबरोबरच आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उपमहापौर उपेक्षा भोईर, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, नगरसेवक सुमित पाटील, प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.
डोंबिवलीतील फडके रोडप्रमाणे यंदा साई चौकातही तरुणाईचा उत्साह पाहावयास मिळाला. सकाळी सहापासून तरुणाईसह वृद्धही उपस्थित होते. दिवाळीनिमित्ताने शुभेच्छा देण्याबरोबरच एक संमेलन भरल्याचे चित्र होते. त्यात रताळी, कारंदे अशा पारंपरिक फराळाचीही जोड होती. कार्यक्रम संपल्यानंतरही बराच वेळ नागरिकांचे ग्रूप दिवाळी सेलिब्रेशन करण्यात मग्न होते. कल्याण येथील दुर्घटनेत शहीद झालेल्या अनंत शेलार व प्रमोद वाघचौरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दोघाही दिवंगत जवानांचे स्मरण करण्यात आले.
जनतेप्रती नतमस्तक : कपिल पाटीलअंजूरदिवे गावाचा एक सरपंच आपल्यामुळे खासदार झाला. संसदेत काम करताना मी प्रत्येक क्षणी जनतेच्या प्रती नतमस्तक होतो. कल्याणवासीयांना जीवननाचा आनंद मिळावा, यासाठी आपण गेल्या वषार्पासून दिवाळ पहाट आयोजित करीत आहोत, असे म्हणत खासदार कपिल पाटील यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बालगायिका सई जोशी व नेहा केणे यांना २५ हजारांचे बक्षीसही जाहीर केले.
डोंबिवली: येथील क-हाडे ब्राह्मण संघाच्यावतीनेही ‘प्रतिभेचा मळा’ या उपक्रमांतर्गत बाबूजी आणि गदिमा यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रम समाजमंदिरामध्ये बुधवारी पहाटे संपन्न झाला. त्यावेळी दिग्गज कलाकारांसह नगरसेवक संदीप पुराणिक, मंदार हळबे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. एक से एक गाण्यांमुळे उपस्थितांमध्ये विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. आजही त्या काळातील गीत मनाचा ठेका धरतात एवढी जबरदस्त ताकत त्याकाळच्या संगीतामध्ये होती, याचीच चर्चा आपापसांमध्ये रंगली होती. सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल ही समाज एकत्रिकरणाचा प्रमुख घटक असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.