ठाणे - दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कर्जतमधील एक दीप शहिदांचा ग्रुप आणि क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठान यांच्या वतीने सिद्धगडावरदिवाळीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो पणत्या लावून बुधवारी (7 नोव्हेंबर) रात्री 12 वाजता पणत्या प्रज्वलित करुन वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना दोन जानेवारी 1943 रोजी सिद्धगडावर येथे वीरगती प्राप्त झाली. तेथे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हुतात्मा ज्योत उभारण्यात आली आहे. तिथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दीपोत्सव साजरा करण्यात आला.
भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील तसेच क्रांतिविरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, हा उद्देश समोर ठेऊन मागील वर्षी पोशीर येथील धनेश राणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे, यंदाचे हे तिसरे वर्ष होते.
सिद्धगड या पवित्र वीरभूमी येथे दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे, मानिवली, पोशीर व इतर गावांमधील तरुण साजरा करत असतात. यावर्षी मुरबाड येथील मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांच्या सहभागाने संपूर्ण परिसर रोषणाईने उजळला होता. यावर्षी तरुणांनी या जागेची साफसफाई देखील चांगल्या पद्धतीने केली होती.
मोठ्या संख्येने तरुण शहीदांचे स्मरण म्हणून एक दिवा तेवण्याकरिता उपस्थित होते. यावेळी मुरबाड पंचायत समितीचे उप सभापती दीपक खाटेघरे, मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बुष्ठे, सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष महेंद्र पवार, क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, धनेश राणे, महेश शिंगटे, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी हुतात्म्यांविषयी कृतज्ञात व्यक्त केली.