डोंबिवली : केडीएमसीकडून स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. पश्चिमेतील भागशाळा मैदानात दिवाळीनिमित्त फटाके विक्रीचे स्टॉल लागले होते. परंतु, निर्माण होणारा कचरा उचलण्याकडे संबंधित स्टॉलधारकांनी दुर्लक्ष केले. दिवाळी झाल्यानंतरही दोन दिवस कचरा जैसे थे राहिल्याने तेथे मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्यांची परवड झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.
पश्चिम भागात महापालिकेचे भागशाळा हे एकमेव मोठे मैदान आहे. याठिकाणी दररोज सकाळ-सायंकाळी नागरिक फेरफटका मारणे तसेच विरंगुळ्यासाठी येतात. खेळाडूही खेळण्याचा आनंदही येथे लुटतात. त्यामुळे नेहमीच खेळाडू, नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनी हे मैदान गजबजलेले असते. परंतु, दिवाळीत येथे फटाकाविक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. २७ ते २९ आॅक्टोबरदरम्यान दिवाळी होती. तत्पूर्वी मैदानात फटाक्यांचे स्टॉल लागले होते. केडीएमसीकडून त्यांना रितसर परवानगी दिली होती. स्टॉलधारकांनी कचरा संकलन फी केडीएमसीकडे भरली गेली होती. परंतु, निर्माण होणाºया कचºयासाठी स्वतंत्र डबा प्रत्येकाने ठेवणे आवश्यक होते. मात्र, याची काळजी घेतली गेलेली नव्हती. मंगळवारी दिवाळी संपल्यानंतर निर्माण झालेला कचरा उचलण्याचे काम महापालिकेच्या कामगारांकडून गुरुवारी सुरू होते. कचरा सलग दोन दिवस जैसे थे राहिल्याने मैदानाला अवकळा प्राप्त झाली होती. मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्यांनाही यात गैरसोयीला सामोरे जावे लागले.
कचºयामध्ये प्लास्टिक पिशव्याही प्रामुख्याने असल्याने दिवाळीच्या कालावधीत प्लास्टिक कारवाईच्या मोहिमेकडे केडीएमसीकडून दुर्लक्ष झाले का? मैदानात साचलेला कचरा पाहता स्वच्छता मार्शल काय करत होते?, असे सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.‘सफाई कर्मचारी होते सुटीवर’यासंदर्भात केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्याधिकारी विलास जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिवाळीनिमित्ताने कर्मचारी सुटीवर होते. त्यामुळे कारवाई प्रभावीपणे करता आली नाही. संबंधित स्टॉलधारकांकडून कचरा संकलन फी घेण्यात आली असल्याचे सांगत मैदानाची साफसफाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले.