ठाणे : दिवाळी व पाडव्यासाठी शासकीय कार्यालयाना चार दिवसांच्या सुट्या घोषीत झाल्या आहेत. यातील धनत्रयोदशीला १७ आॅक्टोबरची सुटी विभागीय आयुक्तांनी घोषीत केली आहे. तर राज्य शासनाने नरकचतुर्दशी म्हणजे दीपावली, लक्ष्मीपुजन आणि बलिप्रतिपदा म्हणजेच पाडव्यासाठी १८ ते २० आॅक्टोबर या तीन दिवसाच्या शासकीय सुट्या जाहीर केल्या आहेत.
खरे तर सोमवारपासूनच दिवाळी फेस्टिवल मूड सुरू होत आहे. यामुळे शासकीय कामांचा जवळजवळ खोळंबाच होणार आहे. मात्र १६ आॅक्टोबरला ठाणे जिल्ह्यातील ३९ ग्राम पंचायतींसाठी मतदान आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदारांच्या नियंत्रणातील अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. २१ आॅक्टोबर कार्यालयीन दिवस असला तरी त्या दिवशी भाऊबीज आहे. यामुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज २३ आॅक्टोबरपासून सुरळीत होणार यात शंका नाही. ग्राम पंचायतींची मतमोजणी धनत्रयोदशीलाच होणार आहे. यामुळे विजयी उमेदवारांमध्ये या दिवशी आनंदोत्सव साजरा होईल. तर पराभवाच्या कारणमिमांसा करीत उर्वरित उमेदवार नात्यागोत्यात रमून दिवाळी साजरी करतील.
माध्यमिक व प्राथमिक शाळांचे शनिवारीच शैक्षणिक प्रथम सत्र संपले आहे. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांना १५ आॅक्टोबर म्हणजे रविवारपासून दिवाळीच्या सुट्या घोषीत झाल्या आहेत. प्राथमिक शाळाना २२ दिवस म्हणजे ५ नोव्हेंबरपर्यंत सुट्या आहेत. तर माध्यमिक शाळाना २ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे १८ दिवस दिवाळीच्या सुट्या घोषीत झाल्या आहेत. या दरम्यान काही माध्यमिक शाळा नववीच्या व दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी आठ दिवस आधीच त्यांचे वर्ग सुरू करण्याच्या तयारीत आहेत.