अनिकेत घमंडी डोंबिवली : सोन्याचे ४० हजार रुपये तोळे झालेले दर आणि गुडविन ज्वेलर्सवर परागंदा झाल्याचे होत असलेले आरोप यामुळे ऐन दिवाळीत ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. गतवर्षी दिवाळीत झाली त्याच्या २५ टक्के देखील खरेदी यंदा झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत गेल्या पाच वर्षांमधील अत्यंत कटू अनुभव असल्याने सराफ व्यावसायिकांचे कंबरडे मोडणारी ही दिवाळी असल्याचे मत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टीक काऊन्सिलचे माजी रिजनल अध्यक्ष, महाराष्ट्र सुवर्णकार सराफ महामंडळाचे सल्लागार नितीन कदम (ठाणे) यांनी व्यक्त केले.
कदम म्हणाले की, गेल्या वर्षीच्या व्यवसायापैकी अवघा २५ ते ३० टक्केच व्यवसाय दिवाळीच्या चार दिवसांत झाला.लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे महत्वाचे दिवस कोरडे गेले आहेत. पूर्वी ग्राहाकांची झुंबड असायची, आता तुरळक ग्राहक आल्याने चिंतेची बाब आहे. देशभरातील व्यावसायिकांचा हाच अनुभव असून व्यवसायाची स्थिती अशीच राहिली तर सराफांनी जगायचे तरी कसे, असा मोठा पेच निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले. गेल्या सात वर्षांमधील सोन्याच्या दरांनी यंदा उच्चांक गाठला असून मंगळवारी २४ कॅरेटसाठी ३९ हजार ५०० असा तोळ््यामागे दर होता, तर ४६ हजार ५०० रुपये प्रती किलो चांदीचा दर होता.
केवळ परंपरा टिकवण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसला. मोठ्या प्रमाणात दागिने न घेता छोटे अलंकार घेण्याला ग्राहकांनी पसंती दिली. दसऱ्याला त्या तुलनेने चांगली स्थिती होती. पण ऐन दिवाळीत पाडव्याला पारंपारिक ग्राहकही पेढीकडे आले नाही ही खरी चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. पूर्वी ग्राहक होते म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर, स्कीम बाजारात यायच्या. पण आता ग्राहकच नाही तर त्यांना आकर्षित करण्यासाठी काय करायचे, असा सराफ व्यावसायिकांपुढे प्रश्न असल्याचे कदम म्हणाले. सध्याची प्रचंड मंदी संपुष्टात येऊन कधी तेजी येईल, या आशेवर व्यावसायिक आहेत. सोन्याचे दर भरमसाठ वाढले त्याचवेळी दिवाळीत ग्राहक कमी होणार ही भीती आम्हाला जाणवत होती, आणि झालेही तसेच. सध्याचा सराफ व्यवसाय सुरु ठेवून जोड धंदा करायचा तर त्यासाठी भांडवल आवश्यक आहे. तेच उपलब्ध नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. जुन्या दराने घेतलेले दागिने मोडण्यासाठी अनेक ग्राहक येतात. त्यांना आताच्या चढ्या दराने आणि तेही दागिन्यांची घट न धरताच पैसे हवे आहेत. पण ते द्यायलाही पैसे नसल्याने काही पेढ्यांमध्ये सराफ व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये तंटे होत आहेत. ही आणखी एक समस्या असून त्याला सामोरे तरी कसे जायचे, हा मोठा पेच असल्याचे कदम म्हणाले.परागंदा ज्वेलर्समुळे भीतीडोंबिवलीत ऐन दिवाळीच्या तोंडावरच गुडविन ज्वेलर्स परागंदा झाल्याच्या चर्चेमुळे ग्राहकांनी सराफांकडे जाणे टाळले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अचानक गाशा गुंडाळून फरार झाला. त्यामुळे हबकलेल्या सोने ग्राहकांना विश्वास देताना नाकीनऊ आलेले असतांनाच आताच गुडविनच्या घटनेमुळे त्यात भर पडली.कारागिरांवर टांगती तलवारनावाजलेल्या मराठी आणि स्थानिक सरफांकडेच सोने खरेदीसाठी जावे, असे मेसेज सोशल मीडियावर दिवाळीत फिरत आहेत. त्यामुळे मराठी सराफ व्यावसायिकांमध्ये जरी समाधानाचे वातावरण असले तरी लगेच काही फरक पडलेला नाही. ज्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये अन्य भाषिक व्यावसायिकांचा समावेश असून अल्प लाभांशासाठी पिढीजात व्यावसायिकांकडे पाठ फिरवली जात असल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सरू आहे. पण दिवाळसण पाण्यात गेल्याचे दु:ख व्यावसायिकांना जास्त असून पेढ्यांमध्ये काम करणारे शेकडो कारागिर, कर्मचाºयांवर टांगती तलवार आहे.