ठाणे - आजपासून मी म्हातारा नाही तर ज्येष्ठ आहे. असे समजून वागा. म्हातारे होऊ नका तर ज्येष्ठ व्हा असा सल्ला देत ज्येष्ठ मनुष्य हा कोणाबरोबर लुडबुड करीत नाही, तो स्वतंत्र जगत असतो आणि दुसऱ्यालाही रस्वतंत्र जगून देतो असे मत हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी व्यक्त केले.
मोरया सोशल ट्रस्ट आणि वावीकर आय इन्स्टिटयूट यांच्यावतीने शनिवारी गडकरी रंगायतन येथे जेष्ठ नागरिकांसाठी ‘जॉयफूल लिविंग ग्रेसफुल एजिंग’ या उपक्रमाचे संमेलन पार पडले. यावेळी कामत यांनी गप्पांच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वय हे माणसाला थकवत नाही तर परिस्थीती थकवते. ती चांगली परिस्थिती कशी आणावी हे तुमच्यावर आहे. जो चांगले काम करतो तो प्रेरणा देतो. पुस्तक वाचणे आणि चांगल्या व्यक्तीसोबत बसणे यापेक्षा चांगला गुरू नाही. यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी पुस्तकातील ‘यश, अपयश आणि मी’ या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन केले. आपण कधीच निवृत्त होत नाही. जोपर्यंत शारीरिक, वाचिक, बौद्धिक आणि मानसिक क्षमता आहे तोपर्यंत काही ना काही काम करत रहावे. आर्थिक आणि भावनिक परावलंबत्व जर नसेल तर आत्मविश्वास वाढतो, ऊर्जा वाढते. त्यामुळे आनंद मजेत घ्या आणि जीवन व्यतीत करा असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी ज्येष्ठांना दिला.
मी माझ्या कारकिर्दीत काम करताना स्वत:ला कुटुंबप्रमुख समजून काम केले म्हणून मला कामातून नेहमीच समाधान लाभले अशा भावना निवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी व्यक्त केल्या. मला माझ्या वाचकांकडून नेहमीच ऊर्जा मिळते. खरंतर ऊर्जा ही आपल्याला क्षणाक्षणाला मिळत असते. ती घेण्याची मात्र ताकद असावी. प्रत्येकाच्या ऊज्रेचा स्रोत हा वेगवेगळा असतो. मी पत्रकार असल्याने येणारा प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी ऊर्जास्रोत आहे असे ज्येष्ठ पत्रकार डॉ. भारत कुमार राऊत यांनी सांगितले. दरम्यान, समाजकार्य करणाऱ्या 14 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.