डोंबिवली : कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सोमवारी सविता नाईक या तरुणीचा मृत्यू झाल्याने या अपघाताची दखल घेऊन मंगळवारी पोलिसांनी दरवाजे अडवून उभ्या राहणाऱ्या महिला प्रवाशांना डब्यात जाण्यास भाग पाडून सुरक्षित प्रवास करण्याचा संदेश दिला.
सोमवारच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही महिलांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यांची भेट घेतली होती. यावेळी महिला डब्यासमोर पोलिसांनी उभे रहावे आणि गाडीत जागा असेल तर महिलांना पुढे सरकायला सांगावे, अशी मागणीकेली होती.
मुंबईच्या दिशेने जाणाºया जलद आणि धीम्या लोकल गाड्या फलाट क्र. पाच व तीन वर येतात. मंगळवारी या फलाटांवर महिलांच्या डब्यापाशी पोलीस उभे असल्याचे निदर्शनास आले. डब्यात जागा असतानाही केवळ हवा खाण्यासाठी दरवाजे अडवणाºया महिलांना डब्यात आतमध्ये जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले. दरवाजा आणि मधला पॅसेज कोणीही अडवू नका, त्यामुळे महिलांना डब्यात प्रवेश करतांना अडथळे येतात. त्यामुळे नाहक जीव जातो, अपघात होतात, असे महिला पोलिसांनी दरवाजात उभ्या असलेल्या महिलांना सांगितले. बहुतांश डब्यांमधील महिलांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देत दरवाजे मोकळे करुन दिले. गाडी फलाटांमध्ये येताच महिला पोलीस खिडकीमधून डब्यात डोकावून महिलांना आत पुढे सरकण्यास सांगत होत्या. तसेच जागा अडवणारे सामानसुमान रॅकमध्ये ठेवण्यास सांगत होत्या.
दरम्यान, पोलिसांनी या कामात सातत्य ठेवावे, अशी मागणी महिला प्रवाशांनी ‘लोकमत’कडे केली. उपनगरीय प्रवासी महासंघ, महिला रेल्वे प्रवासी संघटना यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. सुखद, संरक्षित, सुरक्षित प्रवासाची आम्हाला हमी द्या अशी मागणी संघटनांनी केली.