ठाणे : "रामाचे भक्त सर्व जगात पसरलेले आहेत.रामाचे गुणगान अवश्य करा पण सर्वशक्तिमान अशा रावणाच्या गुणांचे अवमूल्यन कृपया करू नका", असे भावनिक आवाहन ज्येष्ठ लेखक डॉ. र. म. शेजवलकर यांनी केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखिका यामिनी पानगावकर यांच्या 'रावणायन ' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. प्रदीप ढवळ, विलास ठुसे, विदुला ठुसे, कवी नवनाथ रणखांबे, निवेदिका प्रज्ञा पंडित, प्रकाशक संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. शेजवलकर म्हणाले, "रामायण हे वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे. वाल्या कोळीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. कारण रामायण लिहू शकेल इतके शिक्षण त्याकाळी या वर्गाला मिळतच नव्हते. रावणाला कमी लेखून रामायण समजून घेता येणार नाही. विविध भाषेतील अभ्यासकांनी लिहिलेल्या रामायणातील लेखनाचा तटस्थपणे अभ्यास करण्याची गरज आहे. रामायणाचे जेवढे संशोधन होईल तितके नवेनवे आश्चर्यकारक खुलासे कळतील. कोणत्याही ग्रंथाचा एकांगी अभ्यास संशोधनाला मारक ठरतो. लेखिका यामिनी पानगावकर यांनी संशोधनापेक्षा संकलनावर भर दिला आहे. रावण समजून घ्यायचा असेल तर रावणावर जी मोजकी पुस्तके आहेत. त्यांच्याबरोबरच यामिनी पानगावकर यांचेही रावणायन वाचायला हवे."
वाचक रसिकांचे आभार मानून लेखिका यामिनी पानगावकर म्हणाल्या", विविध पुस्तके वाचताना इंद्रायणी सावकार यांच्य रावणायन पुस्तकाने मी भारावून गेले. रावणावर विविध संस्थामध्ये मी भाषणे केली. मी मांडलेला विषय सर्वांनाच आवडला. त्या रसिकांच्या आग्रहामुळे काढावे असे वाटले. त्यासाठी मी अनेक पुस्तके वाचली. त्यानंतर मला समजलेला रावण मी शब्दबद्ध केला आहे."
"महाभारत आणि रामायण हे ग्रँथ म्हणजे भारताच्या सांस्कृतिक वारश्याचे महान शिलालेख असल्याचे सांगून लेखक डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले ", रामायणातील पात्रांमधील ज्याच्याकडे जे चांगले गुण आहेत त्याचा अभ्यास करून तें वाचकांसमोर मांडणे लेखकाचे खरे कौशल्य असते. हे कौशल्य लेखिका यामिनी पानगावकर यांच्या अंगी आहे. त्या उत्तम वक्त्या आहेतच पण या पुस्तकामुळे चिकित्सक लेखिका म्हणूनही त्या ओळखल्या जातील."
सामाजिक सेवेचा नवा आदर्श निर्माण करण्याऱ्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांना शारदा प्रकाशनाच्यावतीने 'सामाजिक सेवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. लेखक व्यंकट पाटील यांना ' रणजित देसाई साहित्य पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.यावेळी विदुला ठुसे , अस्मिता येंडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे शैलीदार सूत्रसंचालन कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी केले.या प्रकाशन सोहळ्यास अनेक रसिक ठाणेकर उपस्थित होते.