ठाणे : माझी पुस्तकं वाचून आपलं आयुष्य बदललं, करीअर बदलली असं लोकं सांगतात म्हणून मला लिहावसं वाटत. शिकत असलेल्या विषयात रस घ्यावा, सौंदर्य शोधायला शिकावं म्हणजे मार्कस् आपोआप मिळतात, तुमच्यातलं कुतुहल मरू देऊ नका असा सल्ला अच्युत गोडबोले यांनी विद्यार्थ्याना दिला.
ठाणे येथील एनकेटी काँलेजच्या सभागृहात संस्थेचा दहावा वर्धापनदिन साजरा झाला. सकाळी कार्यकर्ते व व विद्यार्थ्यांचे अनौपचारिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. यावेळी अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेच्या मदतीने शिकणारे विद्यार्थी, कार्यकर्ते व देणगीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुषमा परचुरे यानी प्रास्ताविक भाषण केले. विद्यार्थ्यानी गायलेल्या स्वागतगीतानंतर दशकपूर्तीचा प्रवास या शिर्षकांतर्गत `करियरसंबंधी समुपदेशन व कार्यकर्त्यांचे सबलीकरण` या विषयावर छोटी नाटुकली तर दहा वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेने केलेले उपक्रम एका पोवाड्यामधून सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाँ अनिता मोकाशी यानी केले. नंतर संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य रंजना कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन, निवेदिता जोशी याऩी संस्थेच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला तर नारायण पोंक्षे यानी पुढील तीन ते पाच वर्षातील नियोजित योजनांची माहिती दिली. यानंतर चांगली शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याना बक्षिसे दिली गेली तसेच विशेष सामाजिक भान दाखवणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला. इंदू थोरात व हफिजा शेख यांना आदर्श पालक तर संस्थेच्या स्वयंसेवक राधीका गडीयार याना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचा विद्यार्थी सुदर्शन भोसले याने पाहुण्यांना त्याच्या हाताने काढलेले त्यांचे स्केच भेट केले व मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या भावी कार्यासाठी ४२ हजारांचा निधी, मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ नानिवडेकर यांच्याकडे सुपूर्द केला. वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला आमदार संजय केळकर व संस्थेचे एक आधारस्तंभ अरूण शेठ उपस्थित होते.