ठाणे : मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी साचल्यास पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने मलवाहिनीवरील मॅनहोल उघडण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. ही बाब अत्यंत धोकादायक असून मॅनहोलमध्ये पडून जीवितहानी होऊ शकते. तरी कोणत्याही परिस्थितीत ही झाकणे उघडू नयेत. तसेच नागरिकांनी पावसात चालताना काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
मुसळधार पावसामुळे मलवाहिनीवरील मॅनहोलची झाकणे पाण्याच्या दाबामुळे बाजूला होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलवाहिनी चेंबर्सच्या झाकणाच्या खाली लोखंडी जाळी बसविलेली आहे. तरीही, काही ठिकाणी चेंबर्सवरील आरसीसी झाकणे पाण्याच्या दाबामुळे बाजूला होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच त्वरित उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.