कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा करू नका, असे पत्र मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महिनाभरापूर्वीच महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे.
सूर्यवंशी यांनी या पत्रात म्हटले आहे की,‘ज्या बिल्डरांना मनपाने बांधकाम परवानगी दिली आहे, त्यांनी प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले पाहिजे. मात्र, काही जण मनपाची परवानगी न घेताच बेकायदा बांधकामे करीत आहेत. ही बेकायदा बांधकामे सरकारी आणि आरक्षित भूखंडांवर केली जात आहेत. बेकायदा इमारती आणि चाळीत घरे घेणाऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते. ती टाळण्यासाठी एखाद्या बिल्डरने वीजपुरवठ्यासाठी अर्ज केल्यास त्याच्याकडे मनपाने बांधकाम परवानगी दिली आहे का, याची शहानिशा करावी. बांधकाम परवानगी असेल तरच त्या बिल्डरला वीजपुरवठा करावा, अन्यथा वीजपुरवठा करू नये. बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा केल्यास तो मनपाच्या सुनियोजित विकासाला बाधक ठरू शकतो. तसेच बेकायदा इमारतीत अपघात झाल्यास त्याची जबाबदारीही महावितरण कंपनीवर येऊ शकते.’
दरम्यान, मनपाने मागील दीड वर्षात ६२० बेकायदा इमारती तसेच धोकादायक इमारतीही जमीनदोस्त केल्या आहेत.
सदस्यांनी अनेकदा उठवला आवाज
बेकायदा बांधकामाचे वीज आणि पाणी तोडले पाहिजे. विजेचा प्रश्न महावितरण कंपनीकडे आहे. मात्र, बेकायदा बांधकामांना नळजोडणी मनपाकडून दिली जात असल्याची ओरड अनेकदा सदस्यांनी महासभेत केली आहे. करपात्र नागरिकांचे पाणी बेकायदा बांधकाम करणारे पाणीचोर करीत आहेत.
तोंडदेखलेपणासाठी कारवाई
जेथे कायद्याचे उल्लंघन होते, तेथे कारवाईदरम्यान वीज, पाणीपुरवठा खंडित केला जातो. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा काही दिवस अथवा महिन्यांनी वीज आणि पुरवठा पुन्हा जोडून दिला जातो. त्यामुळे ही कारवाईही तोंडदेखलेपणासाठी केली जाते.
----------------------------------