ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ज्या सुविधा किंवा सोयी उपलब्ध आहेत, त्या ४० वर्षापूर्वीच्या काळात अपेक्षित होत्या, त्यानुसार ते नाट्यगृह बांधले गेले होते. आता जगात खुप नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यानुसार नवीन नाट्यगॄह बांधावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेने केली. याबाबतचे निवेदन बुधवारी पालिका प्रशासनाला देण्यात आले.
ठाण्यातील गडकरी रंगायतनची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी महापालिका रु. १६ कोटी ३० लाख खर्च करण्याची तरतूद करीत आहे. नेहमीची येतो पावसाळा, त्याप्रमाणे रंगायतनची दुरुस्ती करणे ही नित्याची बाब झाली आहे व त्यासाठी वेळोवेळी करोडो रुपये खर्च केले जातात, तो पैसा सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जातो त्याचा अपव्यय होतो. इतके रुपये खर्च करुन सुध्दा फारसा उपयोग होत नाही हे सर्वज्ञात आहेच. असेही या रंगायतनचे आयुष्य ४० वर्षाचे झाले आहे. तसेही ठा म पा ४० वर्ष जुन्या असलेल्या इमारतींना धोकादायक इमारत म्हणून जाहीर करते. म्हणून रंगायतनच्या दुरुस्तीवर इतकी रक्कम खर्च करण्यापेक्षा रंगायतनची इमारत पुर्णपणे जमिनदोस्त करून त्याच ठिकाणी पुन्हा एकदा भव्य व दिव्य, अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण असे नाट्यगृह बांधावे असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी या मागणीत म्हटले आहे. नवीन नाट्यगृह बांधताना आताच्या रंगायतनच्या त्याच जागेवर १ हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह बांधून सध्याच्या रंगायतनच्या शेजारी असलेली संपूर्ण जागा ताब्यात घेऊन तेथे ३०० आसन क्षमता असलेले लघु नाट्यगृह, नाटकांच्या तालमींसाठी दोन तालीमगृहे, एक सुसज्ज कलादालन, अति महत्वाच्या व्यक्तींसाठी विश्रामगृह, बाहेर गावाहून तसेच दौर्यावरून आलेल्या कलाकारांसाठी निवास व्यवस्था, जेष्ठ नागरिकांसाठी बाल्कनी व नाट्यगृहात जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था असावी, नाटकाचे सामान व सेट रंगमंचावर नेण्यासाठी मोठ्या लिफ्टची व्यवस्था, वाहने उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनतळ, रसिकांच्या सोईसाठी क्रेडीट कार्डवर तिकिटे मिळ्ण्याची व्यवस्था, नाट्यगृहातील अत्यानुधिक ध्वनीक्षेपक यंत्रणा, एक खुले नाट्यगृह असे सर्व अत्यानुधिक सोयींनी परीपूर्ण असे हे रंगायतन असावे. सध्याचे महापालिकेच्या माहिती आणि जनसंपर्क अधिकार्यांच्या अखत्यारीत रंगायतन येत असल्यामुळे आणि त्यांचे आणि रंगायतनच्या कर्मचार्यांचे वेळोवेळी लक्ष असल्यामुळे रंगायतनची परिस्थिती पूर्वीपेक्षा सध्या तरी बरी आहे, शेवटी ही इमारत जीर्णच झाली आहे. या जागेवर, एक मोठे नाट्यगृह, एक लघु नाट्यगृह, पुस्तकांचे संग्रहालय, कलादालन, तालीमगृह, वाहनतळ या सर्व गोष्टी एकत्रित एका संकुलातच करून तेथे एक भव्य कला संकुलच निर्माण होईल व ते आवश्यक आहे. हे सर्व करीत असताना सध्याच्या रंगायतनचा प्रथमदर्शनी चेहरा मोहरा पुन्हा तसाच बांधावा, कारण सध्याचा प्रथमदर्शनी चेहरा मोहरा हे ठाणे शहराचे आकर्षण व मानबिंदु झालेले आहे. अशी नवीन इमारत बांधताना ठाण्यातील तज्ञ व्यक्ती, रंगकर्मी, सर्व सामान्य रसिक यांना आवाहन करून त्यांच्यांकडून सूचना मागवाव्यात,तसेच नाट्य निर्माते व कलाकारांना विश्वासात घेऊन त्यांच्याही सूचनांचा आदर करावा जेणेकरुन नाट्यगृह बांधताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची संपूर्ण काळजी घ्यावी असे ठाणेकर यांनी सुचविले आहे. नवीन रंगायतनाचे बांधकाम चालू असताना नाट्य रसिकांची नाटके पाहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्या काळात सध्याच्या रंगायतन येथून घाणेकर नाट्यगृहांपर्यंत आणि परत येणेसाठी रसिकांसाठी विनामूल्य परिवहनसेवा उपलब्ध करून द्यावी तसेच घाणेकर नाट्यगृहाच्या कार्यक्रमांची तिकिट विक्रीची तात्पुरती व्यवस्था तेथे करण्यात यावी, जेणेकरून रसिक ठाणे शहरातच तिकिटे खरेदी करू शकतील, अशी अपेक्षा ठाणे शाखेने या निवेदनात व्यक्त केली आहे.