भाजपच्या नगरसेवकांची महासभेत मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोविड आपत्तीत जनतेच्या पैशांची उधळपट्टी न करता सत्ताधारी शिवसेनेने लोकाभिमुख कामे करावीत, अशी आग्रही मागणी भाजपच्या नगरसेवकांनी गुरुवारी महासभेत केली.
महापालिकेच्या वेबिनार महासभेत भाजपच्या वतीने नवनियुक्त गटनेते मनोहर डुंबरे व मावळते गटनेते संजय वाघुले यांच्यासह मिलिंद पाटणकर, नारायण पवार, मुकेश मोकाशी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, नम्रता कोळी यांनी आक्रमकपणे विविध मुद्दे मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले.
- मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाईची मागणी
कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या महापालिकेतील ३१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची भरपाई व अनुकंपा तत्त्वावर कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी भाजपने केली.
- दिव्यातील बेकायदा बांधकामांना विरोध
दिवा परिसरातील वाढत्या बेकायदा बांधकामांना सत्ताधारी शिवसेना व महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे. या बांधकामांना भाजपचा तीव्र विरोध असून, दोषी राजकीय नेते व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही केली.
- घंटागाडी प्रकल्पात उधळपट्टी
कोपरी-नौपाडा-उथळसर भागात घंटागाडीद्वारे कचरा उचलण्यासाठीचा २६ कोटींचा प्रस्ताव हा केवळ कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आणला आहे. या प्रस्तावानुसार कंत्राटदाराकडून ३० टाटा ७०९ एलटी वाहने भाड्याने घेतली जातील. एका वाहनाची बाजारभावानुसार किंमत नऊ लाख ४० हजार रुपये असून महापालिका केवळ भाड्यापोटी तीन वर्षांत ३० लाख रुपये कंत्राटदाराला देणार आहे. त्याचबरोबर कार्यालयीन व अनुषंगिक खर्च जादा दाखवून ठाणे महापालिकेच्या तिजोरीची तब्बल ८ ते १० कोटी रुपयांची लूट केली जाणार आहे. कोविड आपत्तीनंतर उत्पन्नावर मर्यादा आली असताना काटकसरीची गरज आहे. त्यामुळे या प्रस्तावातील किमान १० कोटी रुपये कमी करावेत, अशी आग्रही मागणी भाजपने केली.
- जितो ट्रस्टचा घाट का?
ठाणे शहरात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी भाजपचा पाठिंबा आहे. मात्र, टाटा कॅन्सर हॉस्पिटल स्वतंत्रपणे हॉस्पिटल चालविण्यासाठी सक्षम असताना जितो ट्रस्टला का जोडले जात आहे? यापूर्वी विनानिविदा विशेष कोविड हॉस्पिटल, हाजुरी येथील इमारत आणि शाळा जितो ट्रस्टला दिल्या गेल्या. सातत्याने जितो ट्रस्टचा घाट का घातला जात आहे, असा सवाल भाजपने केला. या जागेवर ग्लोबल इम्पॅक्ट हब उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. तो ठराव अचानक रद्द का केला? सदर ग्लोबल इम्पॅक्ट हबचे भवितव्य काय, याचा खुलासा करावा, अशी मागणीही करण्यात आली.