नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महात्मा गांधीजींनी पहिल्या महायुद्धात इंग्रजांची स्तुती करीत तरुणांना सैन्यात दाखल होण्याचे आवाहन केले होते म्हणून काय आपण त्यांच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेतो का? तर त्यामागे त्यांचा उद्देश शुद्ध होता. इंग्रजांनी पहिल्या महायुद्धात भारताने सहकार्य केल्यास देशाला लवकर स्वतंत्र मिळेल ही भावना होती,तशीच भावना स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागण्या मागचा हेतू हा कारागृहात बंदी राहून देश स्वतंत्र करता येऊ शकत नाही जर बाहेर राहिल्यास स्वातंत्र्यलढा अधिक जोमाने उभा करता येऊ शकतो आणि याच भावनेने त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती असे वक्तव्य केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.शुक्रवारी ते काल्हेर येथे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित सावरकर गौरव यात्रेच्या बाईक रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
या प्रसंगी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष पि के म्हात्रे,हरिश्चंद्र भोईर,राजेंद्र भोईर,श्रीधर पाटील,निलेश गुरव यांसह मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.काल्हेर ते कोनगाव या दरम्यान आयोजित या रॅलीत सावरकर चित्ररथ सहभागी केले होते. काँग्रेस पक्षाचे नाव न घेता काही तथाकथित पक्षातील स्वतःला नेते म्हणून घेणारी लोकं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जी टीका करतात ती चुकीची असून समाजा मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम या तथाकथित पक्षातील मंडळींकडून केला जात आहे अशी टीका देखील पाटील यांनी केली आहे.आणि त्याच करता भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या वतीने महाराष्ट्रात सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेंचा आयोजन करून सावरकरांचा विचार सावरकरांचा इतिहास हा तरुणांमध्ये सर्व समाजामध्ये पोहोचवण्याचं काम सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून केलं जात असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले.सावरकरांनी त्यांच्या राष्ट्र कार्याने स्वतःची दहशत निर्माण केली होती.
आणि त्या मुळे हे तथाकथित पक्षातील नेते मंडळी भयग्रस्त झाले असून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी आम्ही सावरकर या माध्यमातून समाजामध्ये वावरत असताना त्यांची सुद्धा दहशत तथाकथित पक्षाची नेत्यामंडळींना नक्कीच राहील.सावरकरांनी त्यांच्या कार्यातून निर्माण केलेली हि दहशत आहे,त्यामुळे तथाकथित पक्षातील लोक सावरकरांचा वारंवार अपमान करून सावरकरांचे विचार संकुचित करण्याचा प्रयत्न करीत आहेत असेही शेवटी पाटील यावेळी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"