लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चायनिज खाऊ नका, असे डॉक्टर वरचेवर सांगतात. परंतु तरुण पिढी ही फास्ट फूडकडे आकर्षित झालेली असल्याने चायनिजच्या अतिसेवनामुळे त्वचा आणि पोटाचे विकार जडतात. त्यामुळे चायनिज शरीराला घातक आहे हा डॉक्टरांचा सल्ला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
चायनिज पदार्थांत अजिनोमोटो अर्थात मोनो सोडियम ग्लुटामिटचा वापर केला जातो. यामुळे पोटाचे विकार वाढतात. त्याचबरोबर त्वचाविकारही वाढतात. फास्ट फूडच्या विळख्यात तरुण पिढी अडकली आहे. आरोग्यदायी शरीरासाठी चायनिज खाणे टाळावे. आहार हा नेहमी स्वादिष्ट असावा पण चटपटीत नसावा. हल्लीच्या पिढीला स्वादिष्टपेक्षा चटपटीत आहार आवडतो, असे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.
१) काय आहे अजिनोमोटो?
अजिनोमोटो हा स्वाद येण्यासाठी टाकला जाणारा पदार्थ आहे. तो शरीराला घातक आहे. अजिनोमोटोने कॅन्सर होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यासाअंती जाहीर केले असल्याचे डॉक्टर सांगतात. शरीराची पचनसंस्था बिघडवण्याचे काम अजिनोमोटोसह ग्लुटेन करते.
२) ...म्हणून चायनिज खाणे टाळा
चायनीजमध्ये अजिनोमोटो आणि प्रीझरव्हेटिव्हज वापरले जातात. यात सोडियम नायट्रेट, फूड कलर, अस्पारटेन, ग्लुटेन हे सर्व घटक असतात. या घटकांमुळे शरीरातील पित्त वाढते. अॅसिडिटी, अल्सर, मूळव्याधसारखे आजार जडतात. त्वचाविकार आणि मूळव्याध याचे प्रमाण चायनिज खाणाऱ्यांमध्ये आढळून येते.
३) स्वादिष्ट आहार म्हणजे त्यात आंबट, कडू, खारट, तुरट, गोड, तिखट हे स्वाद असणे. कुठल्याही अन्नावर अग्निसंस्कार झाले की तो आहार पचण्यास हलका होतो. शरीराला पौष्टिक आहाराची गरज आहे. जिभेला चटपटीत पदार्थ आवडतात. चायनिज पदार्थ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच जण खातात. चायनिज भेळ, मंच्युरियन पकोडे, चायनिज सूप हे स्वस्त आणि बाहेर गाडीवर मिळत असल्याने ते सर्रास खाल्ले जातात. मूळव्याध, त्वचाविकार, पोटदुखी असे आजार सुरू होतात. चायनिज शरीराला घातक असल्याने घरातील सात्विक आहार खाण्याचा सल्ला आम्ही देतो.
- डॉ. अक्षता पंडित, आयुर्वेदतज्ज्ञ