ठाणे : आपले काळचक्र फिरले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्याच काय आता कोणाच्याही व्यासपीठावर जायला मी मोकळा असल्याचे विधान आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. बंडानंतर सरनाईकांनी गुरुवारी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या मलाही भेटले, आमची भेट झाली. परंतु त्यांच्याबरोबर व्यासपीठावर जायचे की नाही? हा नंतरचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर आताच भाष्य करणे योग्य नसल्याचेही सोमय्यांनी सांगितले. आमची न्यायालयीन लढाई आहे, ती मी लढणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
विहंग गार्डन या इमारतीच्या मुद्यावरुन ठाण्यात सोमय्या विरुध्द सरनाईक यांच्यातील संघर्ष थेट न्यायालयार्पयत गेला आहे. तसेच मध्यतंरी सरनाईक यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमीरा देखील लागला होता. परंतु या घटना घडत असतांनाच सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जाण्याचे विचार मांडले होते. त्यामुळे ते चर्चेत आले. दरम्यान शिंदे यांच्या बंडानंतर ते देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. आता ते प्रथमच गुरुवारी ठाणे महापालिकेत आले असता, पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सोमय्यांबाबतची प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाविकास आघाडीचे सरकार असतांना राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाढत होती. त्यामुळे सर्व आमदारांच्या मनात खदखद होती. ती खदखद मी पत्राद्वारे उध्दव ठाकरे यांच्या कानावर घातली होती. मुख्यमंत्री आपला असतांनाही कामे राष्ट्रवादीची अधिक होत असल्याचे सर्व आमदारांचे म्हणने होते. त्या पत्राची दखल घेतली नव्हती. परंतु, त्या पत्रची दखल शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १० अपक्ष आमदारांनी घेतली. त्यामुळे आज अभिमानची गोष्ट आहे की, ठाणे शहरातील आमदार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार आहे आणि ठाण्यातील रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले असल्याचेही दिसत आहे.
ज्या वेळेस कंगना रणौत विरोधात आवाज उठविला तसेच अर्णव गोस्वामी विरोधीत हक्कभंगाचा ठराव मांडला. तक्रारीनुसार मी अर्ज केला होता. त्या विरोधात राज्य सरकार विरोधात भांडलो, देअसेही त्यांनी स्पष्ट केले. एमएमआरडीए मध्ये कथीत घोटाळा जो कधी झालाच नव्हता. एमएमआरडीएने देखील शपथपत्रत सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत असा कोणताही घोटाळा न झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ईडीची चौकशी मागे लागली. सर्वोच्च न्यायालयाने मला सरंक्षण दिले. मात्र, राज्य सरकारकडून सहकार्य किंवा संरक्षण मला किंवा कुटुंबाला मिळाले नसल्याची खंत देखील व्यक्त केली. ठाणे महापालिका असो किंवा जिल्ह्यातील इतर महापालिकेतील नगरसेवक असतील ते आमच्या सोबत असतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात देखील आरटीआय अंतर्गत विहंग गार्डनची माहिती मागविण्यासाठी अर्ज केला होता. मलासुध्दा भेटले होते. माझ्यासोबत सेल्फी काढली होती. सोमय्या यांच्याविरोधातील लढाई ही न्यायालयीन आहे, त्यांनी माझ्यावर आरोप केले, केस टाकली मी सुध्दा त्यांच्याविरोधात दोन केस टाकल्या. परंतु, न्यायालयीन प्रक्रिया सुरुच राहिल. मात्र त्यांच्या बरोबर व्यासपीठावर बसायचे की नाही, हा नंतरचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्या चौकशीसाठी जे सीआरपीएफचे जवान माझ्या घरी आले होते. तेच जवान आज माझ्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळे काळ कोणासाठी कधी थांबेल आणि काळचक्र हे कसे फिरेल हे सांगता येत नाही. परंतु, जुन्या गोष्टींचे कित्ते गिरविण्यापेक्षा ठाण्याच्या विकासाचे आणि सुगीचे दिवस आलेले आहेत. त्यामुळे आता झाले गेले विसरुन जावे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.