मुंबई - भाजप आणि शिंदे गटाकडून महाप्रबोधन यात्रेवर सातत्याने टीका केली जाते, यासंदर्भात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अंधारे यांनी भाजपला एकप्रकारे आव्हानच दिलंय. तसेच, माझी भरचौकात हत्या करायची आहे का, असा सवालही विचारला. महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्व मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेपूर्वी अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला लक्ष्य केलं. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे, असे म्हणत भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
माझी एक स्टाईल आहे, इलाका तुम्हारा, धमाका हमारा. धाराशिवमध्ये मला पत्रकारांनीच चर्चेतून प्रश्न विचारला. राऊतांनंतर आता सुषमा अंधारेंचा नंबर आहे, अशी चर्चा आहे. त्यावर, कशासाठी नंबर असेल माझा, माझ्यासाठी ईडी लावता येत नसेल तर मग माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या जाणार आहेत का, काय केलं जाणारंय, माझा तुम्ही अपघात घडवून आणणार आहात का?. तुम्हाला जे करायचंय ते करा. माझी तुम्ही भरचौकात हत्या करणार आहात का?, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपला लक्ष्य केलं. सुषमा अंधारे यांची आज रत्नागिरी येथे सभा होत आहे, तत्पूर्वी गुरुवारी रात्री त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच, जे करायचंय ते करा, असा इशाराही दिला.
कणकवलीमध्ये श्रीधर नाईकांची भरचौकात हत्या झाली होती, तशी माझी हत्या करणार आहात का?. चला जे करायचंय ते करा. माझा आवाज बंद करण्यासाठी तुम्हाला जे करायचंय ते करा. पण, आम्ही ही महाप्रबोधन यात्रा पूर्ण करणारच, आमचा विचार मांडणारच, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. भय,भ्रम, चरित्र, हत्या ही सगळी अस्त्र तुम्ही वापरली आहेत, असे म्हणत अंधारे यांनी भाजपवर जोरदार टिका केली.